ऑनलाईन टीम/तरुण भारत
Baghdad Bomb Blast : इराकची (iraq) राजधानी असलेल्या बगदादमध्ये (baghdad) आणखी एक भीषण बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये १० लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत २० पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती सुरक्षा आणि वैद्यकीय क्षेत्रातील सूत्रांनी दिली आहे. फुटबॉल स्टेडियमजवळ असलेल्या गॅरेजमध्ये आणि एका टँकरमध्ये हे स्फोट झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण इराकमध्ये खळबळ उडाली असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Explosion near football stadium in Baghdad, 10 killed)
मिळालेल्या माहितीनुसार, बगदादच्या पूर्व भागात असलेल्या एका फुटबॉलच्या मैदानालगत गॅरेजमध्ये आणि एका टँकरमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. एका गाडीमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर जवळच असलेल्या गॅस टँकरमध्येही स्फोट झाला. त्यात दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी आलेल्या लोकांचा समावेश आहे. त्यामुळं आता इराकच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
अचानक झालेल्या या स्फोटानंतर नेमकं काय झालं हे कुणाला समजलं नाही. परंतु मोठा आवाज झाल्यानंतर आकाशात धुराचे लोट पसरल्यानंतर लोकांची एकच धावपळ उडाली. शहरात बॉम्बस्फोट झाल्याचं कळताच बगदाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.