प्रतिनिधी / लातूर
लातूर येथील मयूरबन नावाने असलेल्या उच्चभ्रूच्या सोसायटीत सोमवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटमध्ये दोघांनी प्रवेश करून आम्ही आयकर विभागाचे अधिकारी आहोत, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. कोणालाही फोन करायचा प्रयत्न करू नका असे म्हणून घरातील 10 लाख रूपये रोख कुटुंबियांच्या नजरेसमोरून डोळय़ादेखत घेवून गेल्याचा प्रकार घडला.
याबाबतचे वृत्त असे की, मयूरबन कॉलनी परिसरात गोकुळ क्लासीक अपार्टमेंट फ्लॅट नं. 5 मध्ये दोघेजण घुसले. यावेळी त्यांनी सुनीता कल्याण भागे (रा. वंजाखाडी, ता. रेणापूर) यांना आम्ही आयकर विभागाचे अधिकारी आहोत. आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. घरात पैसे कोठे आहेत हे शोधण्याची आमच्याकडे मशीन आहे. तुम्ही कोणालाही संपर्क करण्याचा तसेच बोलण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणून दोघांनी सरळ बेडरूममधील कपाटातून 500 रूपयांच्या नोटा असलेले रोख 10 लाख रूपये घेवून पोबारा केला.
याप्रकरणी भांगे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत लातूर शहरात काही वेळा आम्ही पोलीस आहोत असे भासवून नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडले होते. पण आता चोरटयांनी आम्ही आयकर अधिकारी आहोत म्हणून दिवसाढवळय़ा 10 लाख रूपये लुटल्याचा प्रकार घडल्याने शहरभर उलट-सुलट चर्चा चालू आहे.