बिबटय़ाच्या दहशतीने 21 शाळांना अजूनही सुटीच : विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची वेळ
प्रतिनिधी /बेळगाव
रेसकोर्स परिसरात बिबटय़ाने धुमाकूळ घालताच खबरदारीचा उपाय म्हणून शहर व ग्रामीण भागातील 21 शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. 22 दिवस होत आले तरी अद्याप बिबटय़ाचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे या सर्व शाळा अद्याप बंदच असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बिबटय़ाचा फटका 21 शाळांमधील 10 हजार 804 विद्यार्थ्यांना बसला आहे.
या परिसरातील शाळा व हायस्कूल बंद असल्यामुळे विद्यार्थी व त्यांचे पालक चिंतेत आहेत. सर्वाधिक नुकसान हे दहावीच्या विद्यार्थ्यांचे होत आहे. त्यामुळे शाळा केव्हा सुरू होणार? या चिंतेत विद्यार्थी आहेत. 5 ऑगस्ट रोजी जाधवनगर येथे बिबटय़ा पहिल्यांदा निदर्शनास आला. त्यानंतर रेसकोर्स परिसरात बिबटय़ाला स्थानिकांनी पाहिले. त्यामुळे 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान शाळांना सुटी देण्यात आली. बिबटय़ाचा शोध लागू शकला नसल्याने अखेर दि. 16 व 17 ऑगस्ट रोजी शाळा सुरू झाल्या. परंतु पुन्हा बिबटय़ाचे दर्शन झाल्यामुळे 18 ऑगस्टपासून 21 शाळांना सुटी देण्यात आली.
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याकाळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले खरे, परंतु ते तितकेसे परिणामकारक झाले नाही. त्यातच आता बिबटय़ामुळे शाळा बंद झाल्या असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची वेळ आली आहे. 21 शाळांमध्ये 10 हजार 804 विद्यार्थी शिक्षण घेत असून हे सर्व विद्यार्थी मागील 20 ते 22 दिवसांपासून शाळेपासून वंचित आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
बेळगाव शहर विभागातील 12 शाळांचा यामध्ये समावेश असून त्यामधील 9 हजार 390 विद्यार्थी तर ग्रामीण भागातील 9 शाळांमधील 1 हजार 414 विद्यार्थ्यांना बिबटय़ामुळे सुटी आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी काही सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने ते शिक्षणापासून वंचित आहेत. तसेच नेटवर्क नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना समस्या येत आहेत. त्यामुळे बिबटय़ाचा शोध लवकर लावून शाळा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या शाळांना सुटी…
बेळगाव शहर विभागातील सरकारी प्राथमिक शाळा हनुमाननगर, कुवेम्पूनगर, सहय़ाद्रीनगर, कन्नड प्राथमिक शाळा सदाशिवनगर, सरकारी मराठी प्राथमिक शाळा सदाशिवनगर, प्राथमिक शाळा विश्वेश्वरय्यानगर, केएलई इंटरनॅशनल स्कूल, वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, केंद्रीय विद्यालय-2, मराठी विद्यानिकेतन, एनपीईटी स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल तर ग्रामीण विभागातील हिंडलगा येथील मराठी प्राथमिक शाळा, कन्नड प्राथमिक शाळा, उर्दू प्राथमिक शाळा, हिंडलगा हायस्कूल, ट्विन्सलॅण्ड स्कूल, सेंट पीटर स्कूल, मराठी प्राथमिक शाळा, कन्नड प्राथमिक शाळा व संत मीरा स्कूल विजयनगर या शाळांना सुटी देण्यात आली आहे.
ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू
जाधवनगर, रेसकोर्स मैदान परिसरात बिबटय़ा निदर्शनास येताच येथील 21 शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. बिबटय़ाकडून शालेय विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, यादृष्टीने जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागामार्फत सुटी जाहीर करण्यात आली असून या 21 शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती शहर शिक्षणाधिकाऱयांनी दिली.
– रवि बजंत्री (शहर शिक्षणाधिकारी)