शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; संशयित फरार; शोध सुरू
सातारा प्रतिनिधी
सरकारी नोकरी लावतो असे अमिष दाखवून साताऱ्यातील तिघांची व मुंबईतील दोघांची 11 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश नंदकुमार शिंदे (रा. बोरगाव ता. सातारा) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वनरक्षक, वनपाल, आरोग्य विभागात नोकरी लावतो असे सांगून राजेश शिंदे याने गणेश कृष्णा चव्हाण (वय २९, सदरबझार सातारा) याला विश्वासात घेतले. या विश्वासाला बळी पडून गणेश कृष्णा चव्हाण (वय २९, सदरबझार सातारा) याने याबाबतची माहिती आपल्या इतर मित्रांना दिली. गणेशचे मित्र निखिल श्रीरंग निकम (रा. सदरबझार ), सचिन दगडु कदम (रा. घाटकोपर मुंबई), सागर संतोष उत्तेकर (रा. कांदवली मुंबई), किरण प्रकाश शिंदे (रा. गडकरआळी, सातारा) यांनी नोकरीच्या अमिषाने राजेश शिंदे यांना गेल्या वर्षभरात ऑनलाईन पद्धतीने ११ लाख रूपये पाठवले. शिंदे यांनी पैसे घेवूनही नोकरी लावली नाही. या बाबतची विचारणा वारंवार होऊ लागल्याने राजेश याने फोन उचलणे बंद केले. तसेच ठरवून दिलेल्या मुदतीत काम न झाल्याने पैसे परत देण्याची मागणी यांच्याकडून होऊ लागली. तरीही ते पैसे दिले नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गणेश याने शहर पोलीस ठाण्यात राजेश विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच राजेश हा फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू असून अधिक तपास पोलीस हवालदार बसवंत करत आहेत.