रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या मुलांसाठी उपक्रम
बेळगाव : रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या तीन वर्षांखालील मुलांचा सांभाळ करण्यासाठी पाळणाघर योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पाळणा घरांसाठी जागा निश्चित करण्याची सूचना ग्रा. पं. ना करण्यात आली असून या पाळणा घरांसाठी ग्रा. पं. पातळीवर 11 सदस्यांची समितीची रचना करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या तीन वर्षांखालील मुलांचा सांभाळ व्हावा. कामगारांना काम करण्यास सोयीचे व्हावे, या उद्देशाने सरकारकडून पाळणा घर सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 270 पेक्षा अधिक ग्राम पंचायतींमध्ये पाळणाघर सोय उपलब्ध करून देण्यासाठी जि. पं. कडून प्रयत्न सुरू आहेत. या पाळणा घरांसाठी सुनियोजित जागा व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाळणाघर भरविण्याची वेळही निश्चित करण्यात आली आहे. सकाळी 9 ते दुपारी 3.30 पर्यंत पाळणाघर भरविले जाणार आहे. या दरम्यान पाळणा घरात येणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच सकस आहाराचाही पुरवठा केला जाणार आहे. याठिकाणी प्रशिक्षित व्यक्तींचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी ग्राम पंचायत व तालुका पंचायतकडून निधी खर्च केला जाणार आहे. या पाळणा घरांवर देखरेखीसाठी 11 सदस्यांची समिती नेमणूक केली जाणार आहे.
ग्रा. पं. अध्यक्षस्थानी असणार
11 जणांच्या सदस्य समितीमध्ये ग्रा. पं. अध्यक्षस्थानी असणार आहेत. सदस्य म्हणून आयसीडीएस अधिकारी, पाळणा घराच्या व्याप्तीत येणाऱ्या सरकारी शाळेचे मुख्याध्यापक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, पाळणा घराचे केअर टेकर, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, महिला संघाच्या प्रतिनिधी, पाळणा घरात मुले दाखल केलेल्या दोन महिला सदस्य, दोन पुरुष सदस्य, पंचायत विकास अधिकारी अशा प्रकारे एकूण 11 सदस्य नेमले जाणार आहेत.