नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमध्ये रविवारी रात्री झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन गर्भवती महिला आणि तीन मुलांचाही समावेश आहे. पहिला अपघात बागपतमधील मेरठ हायवेवरील टोल प्लाझाजवळ झाला. भरधाव कँटरने एका वाहनाला ठोकरल्याने एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. मृत्युमुखी पडलेले सर्वजण सिंगवली अहिर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोला गावातील रहिवासी आहेत. दुसऱया अपघातात सहारनपूरमध्ये ट्रकने व्हॅनला धडक दिल्यामुळे चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघांचा सोमवारी सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.