पंतप्रधानांच्या हस्ते नव्या रेल्वेंचे लोकार्पण : रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना एकाचवेळी नऊ वंदे भारत रेल्वेंची भेट दिली आहे. या सर्व नवीन वंदे भारत रेल्वे आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. नव्याने लोकार्पण झालेल्या वंदे भारत रेल्वेंमुळे अकरा राज्यांतील प्रवासाचा वेळ कमी होणार असून कनेक्टिव्हिटीही वाढणार आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत गाड्या आधीच देशभरातील अनेक मार्गांवर धावत असतानाच आता त्यात आणखी नऊ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या नऊ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या 11 राज्यांमध्ये धावणार आहेत. या राज्यांमध्ये राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातचा समावेश आहे. वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून या राज्यांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. या कार्यक्रमाला 11 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नव्याने लोकार्पण झालेल्या वंदे भारत ट्रेन्समध्ये महिला लोको पायलटचाही समावेश आहे. देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याची ही अभूतपूर्व संधी असल्याचे या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, नव्या रेल्वेंच्या उद्घाटनप्रसंगी वंदे भारत ट्रेनसोबत विद्यार्थ्यांनी सेल्फीही घेतले. शाळकरी मुलांना या नवीन तंत्रज्ञानाच्या रेल्वेंबाबत वेगळेच कौतुक आहे. केरळमधील कासरगोड रेल्वे स्थानकावर या सेवेच्या लोकार्पणप्रसंगी पूजा करण्यात आली. तर, केंद्रीय मंत्री एल मुऊगन यांनी वंदे भारत ट्रेनमधून प्रवाशांसोबत प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या प्रवासातील अनुभव जाणून घेतले.
पर्यटन, रोजगाराला चालना
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात आधुनिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याची ही अभूतपूर्व संधी आहे. आज सुरू झालेल्या गाड्या पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक आणि आरामदायी आहेत. या वंदे भारत गाड्या नव्या भारताच्या नव्या जोशाचे, नव्या उत्साहाचे आणि नव्या उत्साहाचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. वंदे भारत रेल्वेंमुळे पर्यटन आणि आर्थिक क्रियाकलापांनाही चालना मिळाली आहे. वंदे भारत रेल्वे ज्याठिकाणी पोहोचते त्याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तेथे रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. देशात अनेक रेल्वेस्थानके गेल्या अनेक वर्षांपासून विकासाविना खोळंबलेली आहेत. या स्थानकांचा विकास करण्याचे काम सुरू आहे. अमृतकाळात बांधण्यात आलेल्या नवीन स्थानकांना ‘अमृत भारत स्टेशन’ असे संबोधण्यात येईल, असे ते म्हणाले.
अधिकृत निवेदनानुसार, काचेगुडा-यशवंतपूर दरम्यानची वंदे भारत रेल्वेसेवा या मार्गावरील इतर गाड्यांच्या तुलनेत सर्वात कमी प्रवास वेळेसह दोन शहरांमधील सर्वात वेगवान रेल्वे असेल. यात 530 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. याशिवाय पश्चिम बंगालला पाटणा-हावडा आणि रांची-हावडा मार्गावर आणि हावडा-कोलकाता या शहरांदरम्यान आणखी दोन वंदे भारत ट्रेन सेवा मिळणार आहेत.