ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशात योगी सरकारने 12 ते 18 वयोगटातील मुलांना ‘झायकोव्ह-डी’ लसीचे डोस देण्यास मान्यता दिली आहे. आजारी, दिव्यांग मुलांना प्रथम प्राधान्य तत्त्वावर गोरखपूरसह 11 जिल्ह्यात ही लस दिली जाणार आहे. लसीकरण विभागाचे नोडल अधिकारी एन के पांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पांडे म्हणाले, झायडस-कॅडिलाने तयार केलेली झायकोव्ही-डी ही डीएनए आधारीत असलेली जगातील पहिली लस आहे. 20 ऑक्टोबरला भारताच्या औषध नियामकाने 12 ते 18 वर्ष वयोगटासाठी या लसीला मान्यता दिली होती. आता उत्तरप्रदेश सरकारने राज्यातील मुलांसाठी या लसीला मंजुरी दिली असून, लस खरेदीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. मुलांना या लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. या डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असेल. लसीकरणात सुरुवातीला दिव्यांग आणि आजारी मुलांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.