भरतपूरमध्ये भरधाव ट्रेलरची बसला धडक
वृत्तसंस्था/ भरतपूर
राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील हंतरा गावात झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जयपूर-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एका पार्क केलेल्या बसला टेलरने धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. सदर बसमधील प्रवासी गुजरातमधून मथुरा येथे देवदर्शनासाठी निघाले होते.
एक खासगी बस गुजरातमधील भावनगरहून उत्तर प्रदेशातील मथुरा येथे जात असताना टायर फुटल्याने बसच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यादरम्यान, काही प्रवासी बसमध्ये होते तर काही बाहेर उभे असताना भरधाव टेलरने बसला धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती केली बस 30 मीटरपर्यंत ओढली गेल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या अपघातात घटनास्थळीच 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असताना उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजस्थानमधील हंतरा गावाजवळ जयपूर-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भरतपूर रस्ता अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी भरतपूर रस्ता अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. तसेच जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, गुजरात आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीही रस्ते अपघातातील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.