ऑनलाईन टीम/तरुण भारत
Morbi Bridge Collapsed : गुजरातच्या (Gujarat) मोरबीमधील मच्छू नदीवरील पूल (Morbi Bridge) कोसळून१ ४० हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी (३१ ऑक्टोबर) संध्याकाळी घडलेल्या या भीषण घटनेत १४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत राजकोटचे भाजपा खासदार मोहन कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती खुद्द खासदार कुंदारिया यांनी दिली आहे. (12 members of Rajkot BJP MP Mohan Kalyanji Kundariya family killed in Morbi bridge collapse)
मोहन कुंदारिया हे भाजपाचे राजकोटमधील खासदार आहेत. या मोरबी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर भाजपा खासदार मोहन कुंदारिया (Mohan Kundariya) यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचित करताना याबाबत माहिती दिली. “या दुर्घटनेत मी ५ मुलांसह माझ्या कुटुंबातील १२ सदस्य गमावले आहेत. तसेच, मी माझ्या बहिणीच्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत”, असे कुंदारिया यांनी सांगितले.
याशिवाय, “एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन शर्तीच्या प्रयत्नांनी शोध आणि बचावकार्य करत आहेत. दुर्घटनेतून वाचलेल्या सर्वांची सुटका करण्यात आली आहे. मच्छू नदीतील मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि बचाव नौकाही घटनास्थळी आहेत”, असे त्यांनी म्हटले.
बचाव कार्यादरम्यान नागरिकांचे मृतदेह आढळून येत आहेत. यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतेय. जवळपास १२ तास उलटुन गेले तरी, बचावकार्य सुरू आहे. सद्यस्थितीत मृतांच्या शोधासाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.