एका विजेच्या बल्बला जग चमत्कार मानत आहे. कॅलिफोर्निया प्रांतातील लिव्हरमोर शहरात लावण्यात आलेल्या या बल्बने गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्ससह सर्व वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये स्थान मिळविले आहे. वीजेचा हा बल 02-04 वर्षे नव्हे तर 120 वर्षांपासून सतत पेटता आहे.
लिवरमोर शहरातील अग्निशमन विभागाच्या गॅरेजमध्ये हा बल्ब लावण्यात आला होता. पण आता या बल्बच्या जागने शहरात एक विशेष ओळख निर्माण केली आहे. 120 वर्षांपासून हा बल्ब सातत्याने कसा पेटतोय, या बल्बचा फिलामेंट आतापर्यंत सुरक्षित कसा असा प्रश्न लोकांना पडला आहे. कुठल्याही बल्बचा फिलामेंट 1-2 वर्षांपेक्षा अधिक काळ टिकत नसल्याचे इंजिनियर्सचे म्हणणे आहे.
या बल्बचे नाव सेंटेनियल असून तो 1901 मध्ये पहिल्यांदा लावण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत तो पेटता आहे. 1901 मध्ये हा बल्ब 60 वॅटचा होता. कालौघात याचे आउटपूट कमी होत गेले. 2021 मध्ये या बल्बचा प्रकाश 4 वॅटइतका राहिला आहे.
हा बल्ब ओहियोच्या शेल्बी इलेक्ट्रॉनिक कंपनीने तयार केला होता. हा बल्ब 1890 च्या दशकाच्या अखेरीस तयार करण्यात आला होता असे मानेल जाते. डेनिरल बरनेल नावाच्या व्यक्तीने तो खरेदी केला होता. लिवरमोर पॉवर अँड वॉटर कंपनीचा तो मालक होता. हा बल्ब त्याने शहराच्या अग्निशमन विभागाला देणगीदाखल दिला होता.
120 वर्षांच्या याच्या प्रवासात केवळ 2 वेळा अधिकृतपणे तो बंद करण्यात आला होता. हा बल्ब पहिल्यांदा 1937 मध्ये वीजेची तार बदलण्यासाठी बंद करण्यात आला होता. तार बदलल्यावर तो पुन्हा सुरू करण्यात आला होता. त्यानंतर 1976 मध्ये अग्निशमन दलाची इमारत बदलतेवेळी बल्ब बंद करण्यात आला होता. तेव्हा या बल्बला एका परेडसह नव्या इमारतीत नेण्यात आले होते.
या सेंटिनियल बल्बचे जगभरात प्रशंसक आहेत. याचमुळे याची एक विशेष वेबसाइट तयार करण्यात आली आहे. ही वेबसाइट एका कॅमेऱयाशी जोडण्यात आली आहे. हा कॅमेरा दर 30 सेकंदांमध्ये पेटणाऱया बल्बचे नवे छायाचित्र अपडेट करत असतो.