एकूण 20 केंद्रांतून 19807 विद्यार्थी
पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्या बुधवार दि. 15 मार्चपासून सुरू होत असून ती 31 मार्चपर्यंत चालणार आहे. एकूण 20 केंद्रांतून परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 19807 जणांची नोंदणी झाली असून त्यात 9932 मुलांचा तर 9875 मुलींचा समावेश आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अशा एकूण चार शाखांमधून परीक्षा घेतली जाणार आहे. शाखानिहाय नोंदणी पुढीलप्रमाणे – कला शाखा : मुले – 1701, मुली – 3365, एकूण 5066. वाणिज्य : मुले – 3297, मुली – 2782 एकूण – 6079. विज्ञान : मुले – 2531, मुली – 2850 एकूण – 5381. व्यावसायिक : मुले – 2403, मुली – 878 एकूण – 3281. प्रथम सत्र व दुसरे सत्र अशा दोन्ही परीक्षांमधील प्रगती लक्षात घेऊन निकाल लावण्यात येणार आहे. एकच गुणपत्रिका देण्यात येणार असून प्रथम-दुसरे सत्रसाठी वेगळी गुणपत्रिका मिळणार नाही. पुढील शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून मार्च-एप्रिलमध्ये एकच परीक्षा घेण्यात येणार असून सत्र परीक्षा पद्धती रद्द करण्यात येणार असल्याचे मंडळाने कळवले आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बारावीच्या मुलांना दोन सत्र परीक्षांऐवजी एकच अंतिम परीक्षा द्यावी लागणार आहे. बारावीची परीक्षा दररोज सकाळी 9.30 वा. सुरू होणार असून व्यावसायिक शाखा परीक्षा मात्र दुपारी 12 वा. घेतल्या जाणार आहेत.
दहावीची परीक्षा 1 एप्रिलपासून
दरम्यान, दुसरी सत्र दहावी परीक्षा येत्या 1 एप्रिलपासून सुरू होणार असून परीक्षा सकाळी 9.30 वा. चालू करण्यात येणार आहेत. ती परीक्षा 22 एप्रिलपर्यंत चालणार आहे. 7 ते 14 एप्रिल असे दोन दिवस अनुक्रमे गुडफ्रायडे व आंबेडकर जयंतीची सुट्टी असल्याने त्या दिवशी परीक्षा घेतली जाणार नाही. दुसऱ्या सत्र परीक्षेचे (दहावी) संपूर्ण वेळापत्रक शाळांना पाठवण्यात आले असून ते गोवा बोर्डाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. परीक्षार्थिंनी वेळापत्रकाची तसेच परीक्षा केंद्र आसन क्रमांक याची खात्री कऊन घ्यावी व किमान अर्धा तास तरी अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे.