संगमेश्वर-मुरडव नावलेवाडीमधील घटना
संगमेश्वर वार्ताहर
बारावीची परीक्षा सुरू असतानाच रिया रमेश नावले (17, मुरडव-नावलेवाडी) या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास लावत आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. मात्र आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून संगमेश्वर पोलीस तपास करत आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील मुरडव नावलेवाडी येथील रिया रमेश नावले ही बारावीची विद्यार्थिनी आहे. नुकताच तिने इंग्रजीचा पेपर दिलेला होता. तिचे वडील रमेश हे कामानिमित्त मुंबईला असतात. आई, आजी कामावर गेल्यानंतर घरामध्ये कोणीही नाही, हे पाहून तिने घरामध्ये ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना समजताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, कांबळे, सचिन कामेरकर, अनिकेत चव्हाण, खोदल आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रियाने आत्महत्या का केली, या मागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.