पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण ः सोनिया-राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 138 व्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्ये÷ नेते उपस्थित होते. काँग्रेस पक्ष सर्वसमावेशक करण्यासाठी युवक, महिला, उपेक्षित घटक आणि विचारवंतांना आपल्यासोबत सामावून घेतले पाहिजे, असे पक्षाध्यक्ष खर्गे याप्रसंगी म्हणाले. तसेच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने देशभरातील लाखो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने बुधवारी आपला 138 वा स्थापना दिवस साजरा केला. याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नेहमीच देशवासियांच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी काम केले आहे, असे ट्विट खर्गे यांनी केले. घटनेत समाविष्ट केलेल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अधिकारांशी जोडलेल्या संधीच्या समानतेवर आमचा विश्वास आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त माझ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, असे ही त्यांनी म्हटले आहे.