चीनकडून अनोखे पाऊल/ 180 टन खाद्यही मागविले
चीनमध्ये काही दिवसांपूर्वी 14 हत्तींचा कळप स्वतःच्या भागातून एका शहराच्या दिशेने वाटचाल करत होता, पण अथक प्रयत्नानंतर त्यांना जंगलातच ठेवण्यास यश आले आहे. चीनच्या युन्नान प्रांतात अधिकाऱयांनी या प्रवासी हत्तींच्या कळपासून लोकांना वाचविण्यासाठी एक नवी पद्धत शोधून काढली आहेत. चीनने हत्तींच्या मार्गात येणाऱया लोकांनाच हटविणे सुरु केले आहे. आतापर्यंत 1 लाख 50 हजार लोकांना हत्तींच्या मार्गातून हटविण्यात आले आहे.
या हत्तींच्या संरक्षणासाठी चीनने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असाच आहे. भारतातही हत्तींच्या संरक्षणासाठी अशी पावले उचलण्यात आल्यास मानव-वन्यप्राण्यांमधील संघर्ष शमू शकतो.
दीड वर्षांपासून फिरताहेत हत्ती
हत्तींचा हा कळप दीड वर्षांपासून हिंडत आहे. वाटेत येणाऱया अनेक भागांमध्ये या हत्तींनी मोठे नुकसान घडविले आहे. हे हत्ती आता स्वतःच्या पारंपरिक अधिवासाच्या दिशेने जात असल्याने लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
25 हजार पोलीस तैनात
प्रवासी हत्तींच्या देखरेखीच्या मुख्यालयाचे वान योंग हे प्रमुख आहेत. रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हत्तींच्या कळपाने युआनजियांग नदी ओलांडली आणि दक्षिणेच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. त्यानंतर तेथे 25 हजारांहून अधिक पोलिसांना पाठविण्यात आले. मोठय़ा संख्येत वाहने आणि ड्रोन्सला हत्तींवर देखरेख ठेवण्यासाठी तैनात करण्यात आल्याचे योंग यांनी सांगितले.
आहार देखील पुरविला
इतकेच नाही तर हत्तींसाठी 180 टन खाद्यही पुरविण्यात आले आहे. चीनच्या युन्नान प्रांतातच सर्वाधिक आशियाई हत्ती आहेत. हत्तींच्या या कळपाने लोकांचे कित्येक एकरातील पीक फस्त केले आहे. लोकांचे आर्थिक नुकसानही प्रचंड झाले आहे. पण हत्तींनी अखेरीस स्वतःचा अधिवास का सोडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.