4 वर्षांमध्ये 700 स्थानिक युवकांची भरती
वृत्तसंस्था/ श्रीनगर
दहशतवादी संघटनांनी मागील 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये 700 युवकांची भरती केली आहे. केंद्रशासित प्रदेशात सध्या 141 दहशतवादी सक्रीय असून यातील बहुतांश जण विदेशी आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानुसार 5 जुलैपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 82 विदेशी आणि 59 स्थानिक दहशतवादी सक्रीय होते.
हे दहशतवादी प्रामुख्याने लष्कर-ए-तोयबा, तसेच त्याच्याशी संबंधित संघटना द रेजिस्टेन्स प्रंटसह जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यासाख्या संघटनांचे आहेत. विविध दहशतवादी संघटनांनी मागील 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये 700 स्थानिक युवकांना सामील करवून घेतले आहेत. यातील 187 जणांची 2018 मध्ये दहशतवादी संघटनांनी भरती केली होती. तर 2019 मध्ये 121 आणि 2020 मध्ये हा आकडा 181 राहिला होता. 2021 मध्ये दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेल्या युवकांची संख्या 142 राहिली. चालू वर्षाच्या जून महिन्याच्या अखेरपर्यंत 69 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला आहे.
सुरक्षा दलांनी चालू वर्षात आतापर्यंत 55 चकमकींमध्ये 125 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर दहशतवादी कारवायांमध्ये चालू वर्षात 2 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये चालू वर्षात 20 नागरिक मारले गेले आहेत. केंद्रशासित प्रदेशात यंदा एकूण 8 ग्रेनेड हल्ले झाले आहेत.