विविध 27 संघटनांचा सहभाग : जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने 8 जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ातून 15 हजार कर्मचारी संपात उतरणार आहेत. तर विविध 27 कर्मचारी संघटना संपात सहभागी होणार आहेत. या संपानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी एस. एल. सपकाळ व राजन वालावलकर यांनी पत्रकारांना दिली.
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून कर्मचाऱयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यात 40 टक्के रिक्त पदे आहेत. ती भरावीत, यासह विविध 24 मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने 8 जानेवारीला एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती, राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जि. प. कर्मचारी महासंघ, सर्व प्रकारच्या कामगार संघटना तसेच ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, आशा वर्कर्स, बँक, पोस्ट, आरोग्य कर्मचारी महासंघ आदी विविध प्रकारच्या 27 कर्मचारी संघटना या संपामध्ये सहभागी होणार आहेत.
बुधवारी होणारा संप सिंधुदुर्गात यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन झाले असून संप शंभर टक्के यशस्वी केला जाणार आहे. या संपामधून कर्मचाऱयांची एकजूट दाखविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून कर्मचाऱयांमधील असंतोष व्यक्त केला जाणार आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता ओरोस रवळनाथ मंदीर येथे सर्व कर्मचारी एकत्र जमून रवळनाथ मंदीर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला जाणार आहे. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना दिले जाणार आहे. हा संप यशस्वी करण्यासाठी जिल्हय़ातील सर्व राज्य व केंद्रीय कर्मचारी, निमसरकारी, व कामगारांनी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक किसन धनराज, यांनी केले आहे. यावेळी संघटनेचे सरचिटणीस राजन वालावलकर, सत्यवान मालवे, विलास रायकर आदी उपस्थित होते.