मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ठरले दोषी
वृत्तसंस्था/ लंडन
लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग आणि मानव तस्करीत सामील 11 भारतीयांसमवेत 16 दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. 11 भारतीयांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. 2017-19 पर्यंत दुबई आणि युएईसाठी अनेकदा प्रवास करून युकेमधून सुमारे 70 दशलक्ष पाउंड इतकी रक्कम देशाबाहेर नेण्यात आल्याचे तपासादरम्यान इंग्लंडच्या राष्ट्रीय अपराध यंत्रणेला आढळून आले होते.
ही रक्कम अमली पदार्थ आणि प्रतिबंधित औषधांची विक्री तसेच संघटित स्वरुपातील घुसखोरीच्या गुन्ह्यांद्वारे कमाविण्यात आली होती. यंत्रणेने युकेमध्ये एका कूरियरमधून सुमारे दीड दशलक्ष पाउंड इतकी रक्कम जप्त केली होती. या रकमेसंबंधीच्या तपासानंतर आरोपींविषयी खुलासा झाला होता. तसेच मानवी तस्करीचेही गुन्हेही उघडकीस आले होते.
अनेक आठवड्यांची पाळत तसेच दूरसंचार अन् प्रवासविषयक डाटाच्या विश्लेषणानंतर तपास यंत्रणेने आरोपींना अटक केली होती. या गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या चरण सिंह याला ताब्यात घेण्यात आले होते. चरण सिंह टोळीच्या अन्य सदस्यांसाठी दुबईच्या प्रवासाची व्यवस्था करत होता. या माध्यमातून ते रक्कम विदेशात पोहोचवित होते. चरण सिंहला याप्रकरणी साडेबारा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर त्याचा साथीदार स्वंदर सिंह ढल्लला मनी लॉन्ड्रिंगसाठी 10 वर्षांची तर मानव तस्करीसाठी अतिरिक्त पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टोळीतील अन्य 15 सदस्यांना 9 वर्षांपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.