10 मी एअर पिस्तूल प्रकारात शानदार कामगिरी, 18 वर्षाच्या इशाला रौप्य : भारतीय नेमबाजांचा अचूक नेम
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आपला धडाका सहाव्या दिवशी कायम ठेवला. शुक्रवारी भारताने तब्बल दोन सुवर्णासह तीन रौप्यपदके नेमबाजीत मिळवली. 50 मी 3 पोझिशन रायफल प्रकारात ऐश्वर्य प्रताप, स्वप्नील कुसाळे व अखिल यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. यानंतर 10 मी एअर पिस्तूल प्रकारात अवघ्या 17 वर्षाच्या पलकने सुवर्ण तर इशा सिंगने रौप्यपदक जिंकले. याशिवाय, टेनिसमध्ये दुहेरीत साकेत मायनेनी व रामकुमार यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर बॉक्सिंगमध्ये 50 किलो गटात निखत झरीनने सेमीफायनलसह पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही मिळवले.
विक्रमासह सुवर्ण
स्वप्नील कुसाळे, ऐश्वर्य प्रताप सिंग, अखिल शेरॉन यांच्या पुरुष संघाने 50 मीटर रायफल 3पी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने 1769 गुण मिळवले. त्याचबरोबर चीनने 1763 गुण मिळवून रौप्यपदक जिंकले. तर कोरियन संघाने 1748 गुणासह कांस्यपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, भारतीय पुरुष संघाने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीचा विश्वविक्रमही मोडला. स्वप्नील व ऐश्वर्य या दोघांनी 591 गुण तर अखिलने 587 गुणाची कमाई केली. भारतीय खेळाडूंनी एकूण 1769 गुण मिळवले. त्यांनी गतवर्षी पेरुमध्ये झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील अमेरिकेचा विक्रम मोडला. अमेरिकेने एकूण 1761 गुण मिळवले होते. या स्पर्धेत भारताच्या स्वप्नील, ऐश्वर्य व अखिल यांनी जबरदस्त कामगिरी करत विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली.
50 मी रायफल 3 पोझिशनमध्ये ऐश्वर्यला रौप्य
दुसरीकडे, भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंगने आणखी एक पदक आपल्या नावावर केले आहे. त्याने सांघिक स्पर्धा जिंकल्यानंतर वैयक्तिक पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्सच्या अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकले. ऐश्वर्यने 459.7 गुण मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनच्या लिन्सूने विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. त्याला 460.6 गुण मिळाले. भारताचा स्वप्नील सुरेश बराच काळ पहिल्या स्थानावर राहिला, मात्र शेवटच्या क्षणांमध्ये तो मागे पडला. त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्वप्नीलला 438.9 गुण मिळाले. तर कोरियाने कांस्यपदक जिंकले.
10 मी एअर पिस्तूल प्रकारात सांघिक रौप्य
युवा नेमबाज ईशा सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. 18 वर्षीय ईशा (579), पलक (577) आणि दिव्या टीएस (575) यांचा एकूण स्कोअर 1731 होता. चीनने 1736 गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले, हा आशियाई क्रीडा स्पर्धेतील विक्रमही आहे. चिनी तैपेईला कांस्यपदक मिळाले. विशेष म्हणजे, अंतिम फेरीत थोडेसे पिछाडीवर पडल्याने भारतीय महिला संघ चीनपेक्षा 5 गुणांनी मागे राहिला, अन्यथा त्यांनी सुवर्णपदक जिंकले असते.
17 वर्षांच्या पलकचा ‘सुवर्णभेद‘, 18 वर्षाच्या ईशाला रौप्य
पलक गुलिया आणि ईशा सिंग यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. दोघांनीही एकमेकांना कडवे आव्हान देत अव्वल दोन स्थान पटकावले. 17 वर्षीय पलकने सुवर्ण तर ईशाने रौप्यपदक जिंकले. पाकिस्तानच्या तलकला कांस्यपदक मिळाले. पलकचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिले वैयक्तिक पदक असून तिने अंतिम फेरीत 242.1 स्कोअर केला. विशेष म्हणजे, तिचा हा स्कोअर आशियाई स्पर्धेचा विक्रम ठरला तर तिला टक्कर देणाऱ्या ईशाने वैयक्तिक अंतिम फेरीत 239.7 गुणासह रौप्यपदकाची कमाई केली.
महिला स्क्वॉश संघाला कांस्य
दरम्यान, भारतीय महिला स्क्वॉश संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत त्यांना हाँगकाँगविरुद्ध 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. प्रारंभी, पहिल्याच लढतीत तन्वी खन्नाला पराभवाचा सामना करावा लागाल. यानंतर अनुभवी जोश्ना चिनप्पाने दुसरा सामना जिंकून भारताला बरोबरीत आणले. पण तिसऱ्या व निर्णायक सामन्यात अनहत सिंगला पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
साकेत मायनेनी-रामकुमार रामनाथनला रौप्य
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या टेनिस डबल्समध्ये साकेथ मायनेनी, रामकुमार रामनाथन यांच्या जोडीने कमाल कामगिरी केली. मात्र अंतिम सामन्यात या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुरुषांच्या टेनिस डबल्समध्ये साकेथ मायनेनी-रामकुमार रामनाथन यांच्या जोडीला चीनी तैपेईच्या बिगर मानांकित जंग जेसन आणि हसू यू-ह्सिओ या जोडीने 6-4, 6-4 ने पराभूत केले. यंदा आशियाई स्पर्धेतील टेनिसमधील हे पहिलेच पदक आहे. दुसरीकडे, मिश्र दुहेरीत रोहन बोपन्ना व ऋतुजा भोसले यांनी उपांत्य फेरी गाठत आणखी एक पदक निश्चित केले आहे.
भारताची पदकसंख्या 33 वर
स्पर्धेच्या सहाव्या दिवशी नेमबाजांनी कमाल करताना दोन सुवर्णासह तीन रौप्यपदकांची कमाई केली. याशिवाय, टेनिस, स्क्वॅशमध्येदेखील पदके मिळाली. यामुळे पदकतालिकेत भारत 8 सुवर्ण, 12 रौप्य व 13 कांस्यपदकासह एकूण 33 पदके मिळवत चौथ्या स्थानावर आहे.
सहाव्या दिवशी आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी जिंकलेली पदके
नेमबाजी – 10 मीटर पिस्तूल महिला संघ, रौप्यपदक
नेमबाजी – 50 मीटर 3 थ्री राइफल पुरुष संघ, सुवर्णपदक
नेमबाजी – 10 मीटर पिस्टल वैयक्तिक (पलक गुलिया), सुवर्णपदक
नेमबाजी – 10 मीटर पिस्टल वैयक्तिक (इशा सिंग), रौप्यपदक
नेमबाजी – 50 मीटर 3 थ्री राइफल वैयक्तिक (ऐश्वर्य प्रताप सिंग), रौप्यपदक
टेनिस – पुरुष डबल्स (रामकुमार रामनाथन-साकेत), रौप्यपदक
स्क्वॅश – भारतीय महिला संघ, कांस्यपदक
गोळाफेक – किरण बालियान, कांस्यपदक
निखत झरीनला ऑलिम्पिकचे तिकीट, अवघ्या 127 सेकंदात मिळवला विजय
भारताची दोन वेळ वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर निखत झरीनने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करताना 50 किलो गटात उपांत्य फेरीत प्रवेश करत आपले पदक पक्के केले. तिने उपांत्यपूर्व फेरीत जॉर्डनच्या नासार हनानचा पराभव केला. विशेष म्हणजे, तिने हा सामना केवळ 127 सेकंदात जिंकला. तिचे पंच इतके आक्रमक होते की सामनाधिकाऱ्यांनी काही काळ हा सामना थांबवला होता. या विजयासह तिने केवळ आशियाई स्पर्धेतील पदकच पक्के केले नाही तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला बॉक्सिंगसाठी पहिला कोटा देखील मिळवून दिला.
पुरुष बॅडमिंटन संघाने रचला इतिहास, तब्बल 37 वर्षानंतर मिळणार पदक
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने नेपाळचा 3-0 असा धुव्वा उडवला. या विजयासह भारताने स्पर्धेतील आपले पदक निश्चित केले. तब्बल 37 वर्षानंतर भारत आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकावर मोहर उमटवली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताचा सामना इंडोनेशिया आणि कोरिया यांच्यातील विजेत्याशी होईल. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने नेपाळचा 3-0 असा पराभव केला. भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेन प्रथम कोर्टवर आला, त्याने प्रिन्स दहलचा 21-5, 21-8 असा पराभव केला. यानंतर दुसऱ्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतने सुनील जोशीला 21-4, 21-13 अशी पराभवाची धुळ चारली. तिसऱ्या सामन्यात मिथुन मंजुनाथने बिष्णू कटुवालवर 21-2, 21-17 असा विजय मिळवला. यामुळे स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे कांस्यपदक निश्चित झाले.
दरम्यान, भारतीय महिला बॅडमिंटन संघाच्या पदरात निराशा पडली. पीव्ही सिंधूच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूला पहिल्या एकेरी सामन्यात चोचुवाँगने 21-14, 15-21, 14-21 असे पराभूत केले. यानंतर त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना जोंगकोल्फान किट्टीथाराकुल आणि रविंदा पीने यांनी 21-19, 21-5 अशी मात दिली. तर अश्मिताला बुसानने एकतर्फी पराभूत केले. भारतीय महिला संघाने 2014 मध्ये इंचेऑन येथे शेवटचे कांस्यपदक जिंकले होते.
अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले पदक
आशियाई स्पर्धेत शुक्रवारी नेमबाजीत कमाल केल्यानंतर गोळाफेक प्रकारात किरण बालियानने भारताला पहिले पदक मिळवून दिले. तिने 17.36 मीटर गोळा फेकत कांस्यपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, 1951 नंतर प्रथमच भारताला गोळाफेकमध्ये पदक मिळाले आहे. गोळाफेकमध्ये पदक मिळवण्यासाठी भारताला तब्बल 72 वर्षे वाट पहावी लागली. चीनने या प्रकारात सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.