कॅश व्हॅन लुटण्याचा प्रयत्न उधळला : लुटारूंशी जोरदार संघर्ष
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये गोळीबार झाला. लिम्पोपो प्रांतात झालेल्या चकमकीत पोलिसांनी 18 संशयित गुन्हेगारांना गोळ्या घालून ठार केले. हे सर्व दरोडेखोर पॅश-इन-ट्रान्झिट (पॅश व्हॅन) लुटण्याच्या तयारीत असतानाच त्यांना टार्गेट करण्यात आल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या उत्तरेकडील मखाडो प्रांतातील राष्ट्रीय पोलीस आयुक्त पॅनी मासेमोला यांनी सांगितले. दरोडेखोरांच्या एका गटाने कॅश व्हॅन लुटण्याचे नियोजन केल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर सुरक्षा दलाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार हाती घेण्यात आलेल्या कारवाईवेळी पोलीस आणि लुटारूंमध्ये प्रचंड संघर्ष झाला. लुटारूंनी पोलिसांवर गोळीबार सुरू करून फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांच्या व्यापक फौजफाट्यातून दरोडेखोर निसटू शकले नाहीत. दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या संघर्षात सर्व 18 गुन्हेगारांना ठार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. यावेळी दोन पोलीसही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.