कोचऱ्याचे सुपुत्र अमोल राऊळ यांचा विक्रम, विक्रम करणारे पहिले भारतीय
‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद, स्वत:चाच विक्रम मोडला
बाळू राऊळ / कुडाळ
वेगवेगळय़ा प्रकारचे 181 पास्ता, तेही 220 मिनिटांत तयार करण्याचा विक्रम करणारा पहिला भारतीय हा बहुमान वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा-मायनेवाडी येथील अमोल अभिमन्यू राऊळ यांनी मिळविला असून ‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड’मध्ये त्यांच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.
गोरेगाव-मुंबई येथील पाटकर-वर्दे कॉलेजमधील आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) विभागात समन्वयक म्हणून सध्या कार्यरत असणारे शेफ अमोल राऊळ यांनी या अगोदरचा सलग शंभर पास्ता तयार करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडत हा नवीन विक्रम नोंदविला आहे.
3 तास 40 मिनिटांचा अवधी
सलग 181 डिश पास्ता तयार करण्यासाठी त्यांना 220 मिनिटे, म्हणजेच 3 तास 40 मिनिटांचा अवधी लागला. हे सर्व पास्ता वेगवेगळय़ा पद्धतीचे होते, तर यातील तेरा पास्ता अमोल यांनी स्वत: शोधून नाविन्यपूर्ण पद्धतीने तयार केले होते. प्रत्येक पास्ता तयार करण्यासाठी जवळपास 1 मिनिट 2 सेकंद एवढा वेळ त्यांना लागला.
375 घटक पदार्थ, 22 किलो पास्ता
हा विक्रम करणारे ते पहिलेच भारतीय ठरले. अमोल यांनी हे पास्ता तयार करण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारचे 375 घटक पदार्थ आणि 22 किलो पास्ता वापरला. ‘इम्युनिटी बूस्टर पास्ता’ हा वेगळा प्रयोगही त्यांनी केला. यामध्ये शतावरी, तुलसी, जांभूळ पन्हे, आवळा चूर्ण व ज्येष्ठमध्य यांचा वापर करून पाच वेगवेगळे पास्ता बनविले. ग्रेव्ही पास्ता, प्रूट पास्ता यासारख्या पास्त्यांचाही यामध्ये समावेश होता.
गोरगरिबांना वाटप
या विक्रमाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या 181 पास्त्यांचे अमोल यांनी गोरगरिबांना वाटप केले. गोरेगाव व दहिसर या पट्टय़ात पदपथावर राहणाऱ्या गोरगरिबांना त्यांनी तो पास्ता वाटला.
योगा-द्रवरुप आहार
तंदुरुस्तीसाठी म्हणून त्यांनी योगासने व आठवडाभरापासून फक्त द्रवरुप आहार घेतला. पाटकर-वर्दे कॉलेजच्या चीफ एज्युकेशन ऑफिसर डॉ. माला खारकर, सहसचिव डॉ. गुरुनाथ पंडित, पाटकर कॉलेजच्या हॉस्पिटॅलिटी विभागातील विद्यार्थ्यांचेही त्यांना याकामी सहकार्य व मार्गदर्शन लाभले.