बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डने मागील काही वर्षांपासून वीजबिल जमा केलेले नाही. यामुळे तब्बल 2 कोटी 80 लाख रुपयांचे वीजबिल अद्यापही थकीत आहे. मध्यंतरी हेस्कॉमकडून कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील पथदीपांचा वीजपुरवठा काही दिवसांसाठी बंद केला होता. तरीदेखील वीजबिल जमा करण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष होत आहे. बेळगावमधील कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात पथदीप व पाणीपुरवठ्यासाठी हेस्कॉमकडून वीजपुरवठा केला जातो. महिनाकाठी आलेले बिल कॅन्टोन्मेंटकडून वसूल केले जाते. निधी नसल्याचे कारण देऊन मागील चार ते पाच वर्षांपासून बोर्डने वीजबिल जमा केलेले नाही. अनेकवेळा हेस्कॉमने नोटिसा पाठवूनदेखील केवळ 20 ते 25 लाख रुपये वीजबिल जमा करून बोळवण करण्यात आली.
सरकारी विभागांचीच थकबाकी वाढत असल्याने हेस्कॉम दिवसेंदिवस डबघाईला येत आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपूर्वी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंटचा वीजपुरवठा बंद करण्याची सूचना केली होती. पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा बंद करणे योग्य नसल्याने केवळ पथदीपांसाठी जोडलेला वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांनी आपण लवकरच वीजबिल जमा करू, अशी माहिती हेस्कॉमला दिली होती. जून 2023 मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डने 1 कोटी 61 लाख रुपये हेस्कॉमकडे जमा केले. अद्यापही 2 कोटी 80 लाख रुपये जमा करणे बाकी आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये होणारे हस्तांतर अद्यापही रखडले असल्याने निधीची कमतरता भासत आहे. परंतु यामुळे हेस्कॉम डबघाईला येत असल्याचे दिसत आहे.