परिवहनला दिलासा : विविध मार्गांवर बस सुसाट
प्रतिनिधी/ बेळगाव
परिवहनने दिवाळीसाठी विविध मार्गांवर जादा बसची व्यवस्था केली होती. या बससेवेतून परिवहनला 20 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे दिवाळीतून परिवहन प्रकाशमय झाले आहे. दिवाळी सणातून अतिरिक्त महसूल प्राप्त झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या परिवहनला दिलासा मिळाला आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने 9 नोव्हेंबरपासून विविध मार्गांवर जादा बस पुरविल्या आहेत. या बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नात भर पडली आहे. दिवाळी सणासाठी परिवहनने पुणे, मुंबई, बेंगळूर, मंगळूर, हैदराबाद, नाशिक, गोवा, म्हैसूर आदी ठिकाणी अतिरिक्त बसची व्यवस्था केली होती. सामान्य बसबरोबर वातानुकूलित बसदेखील विविध ठिकाणी धावल्या आहेत. दिवाळी सणातील लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज आदांच्या सलग सुट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढली होती. त्यामुळे अतिरिक्त बससेवेला प्रवाशांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद वाढला आहे.
दिवाळी सणासाठी मूळगावी परतणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. यासाठी परिवहनने विशेष बससेवेची व्यवस्था केली होती. दिवाळी काळात ही जादा बससेवा विविध मार्गांवर धावली आहे. त्यामुळे परिवहनच्या तिजोरीत अपेक्षेप्रमाणे महसूल जमा झाला आहे. विशेषत: प्रवाशांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्था करण्यात आली होती. यालाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे परिवहनचे उत्पन्न वाढले आहे.
ए. वाय. शिरगुप्पीकर, डेपो मॅनेजर
दिवाळीसाठी धावलेल्या बसच्या माध्यमातून आतापर्यंत 20 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. विविध शहरांकडे जादा बससेवा पुरविण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळाला आहे. त्यामुळे महसूल वाढला आहे.