रिझर्व्ह बँकेने 2,000 ची नोट येत्या चार महिन्यांमध्ये चलनातून काढून घेण्याचा निर्णय घोषित केला आहे. त्यामुळे ज्यांच्याजवळ या नोटा आहेत त्यांनी त्यांच्याऐवजी दुसऱ्या नोटा घेण्याची, किंवा त्या नोटा बँकेत जमा करण्याची प्रक्रिया हाताळण्यास प्रारंभ केला आहे. पण या नोटांनी एक अनोखा बळी घेतला आहे.
तर ही कथा अशी आहे, की, दोन मुलींनी त्यांच्या मातीच्या मिरेलात (पैसे साठविण्याचे बंद मडके) दोन हजारांच्या नोटांची बचत केली होती. आता या नोटा बंद होणार आहेत, त्यामुळे त्या बँकेत भराव्या लागणार आहेत, हे समजल्यावर त्यांनी या नोटा वाचविण्यासाठी आपल्या गाडग्याचा बळी देण्याचे ठरविले. त्यांनी जमीनीवर आदळून हे गाडगे फोडले. त्यातून 2 हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचा अक्षरश: मोठा ढीगच बाहेर पडला. या मुलींनी या प्रसंगाचा व्हिडीओ बनवून तो सोशल मिडियावर टाकल्याने ही बाब सर्वतोमुखी झाली. पैशाची बचत करणे ही सर्वसामान्य बाब आहे. पण मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींनी इतक्या 2,000 च्या नोटांची बचत केली तरी कशी, हा प्रश्न आता सोशल मिडियावर उपस्थित केला जात आहे. त्याचे उत्तर या मुली किंवा पालकच देऊ शकतील.