वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोणत्याही ओळखपत्राविना 2,000 ऊपयांच्या नोटा बदलून देण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. आपल्या याचिकेत उपाध्याय यांनी आरबीआय आणि एसबीआयला 2000 ऊपयांच्या नोटा बदलण्यासाठी आयडी पुरावा देणे बंधनकारक करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली होती. याप्रकरणी सोमवारी न्यायमूर्ती सतीश कुमार शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या 2,000 ऊपयांच्या नोटा स्लिपशिवाय आणि ओळखीच्या पुराव्याशिवाय बदलून देण्याच्या अधिसूचनेला याचिकेत आव्हान देण्यात आले होते. सदर अधिसूचना मनमानी, तर्कहीन आणि घटनेच्या कलम 14 चे उल्लंघन करणारी आहे, असे याचिकेत म्हटले होते.