उत्तराखंड सरकार फेब्रुवारी महिन्यात अधिसूचना काढणार
देहराडून / वृत्तसंस्था
हरिद्वारमध्ये 2021 मध्ये होणारा कुंभमेळा केवळ 48 दिवसांचा असणार आहे. सर्वसाधारणपणे मार्च ते एप्रिल या कालावधीत हा सोहळा होणार असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उत्तराखंड सरकार यात्रेसंबंधी औपचारिक अधिसूचना जारी करणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उत्तराखंडचे नगरविकास मंत्री मदन कौशिक यांनी रविवारी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री त्रिवेंदसिंग रावत यांच्या सूचनेनुसार सरकारने कुंभमेळा 2021 साठी कोविड केअर सेंटर, वैद्यकीय यंत्रणा आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी 14 कोटी 29 लाख रुपये जाहीर केले आहेत. कुंभमेळय़ावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी रविवारी 6.94 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारने या यंत्रणेसाठी 17.34 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कुंभमेळय़ात सरकारने 1000 खाटांचे तात्पुरते कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. मंजूर झालेल्या रकमेपैकी कोविड सेंटरसाठी 6.18 कोटी रुपये जाहीर करण्यात आले.