21 राज्यांमध्ये भागीदारी प्रारुपात होणार स्थापना : संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संरक्षण मंत्रालयाने शनिवारी 21 नव्या सैनिक शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या सैनिक शाळांची स्थापना स्वयंसेवी संस्था, खासगी शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारांसोबत भागीदारीच्या अंतर्गत होणार आहे. या शाळा इयत्ता 6 वीपासून सुरू होतील. देशभरात भागीदारी प्रारुपात सरकार अशा आणखीन 79 नव्या सैनिक शाळा सुरू करणार आहे.
या नव्या सैनिक शाळा सध्या कार्यरत सैनिक शाळांपेक्षा वेगळय़ा असतील. या 100 सैनिक शाळा सुरू करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष्य विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सैन्यात सामील होण्यासह कारकीर्दीच्या उत्तम संधी प्रदान करणे आहे.
खासगी क्षेत्राचेही योगदान
या पावलामुळे मुलांना भविष्यातील जबाबदार नागरिक करण्याची तयारी केली जाणार आहे. तसेच खासगी क्षेत्राला राष्ट्रउभारणीच्या दिशेने सरकारसोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याचे सरकारचे मानणे आहे. या नव्या सैनिक शाळा संबंधित शिक्षण मंडळांच्या मान्यतेसह सैनिक स्कुल सोसायटीच्या कक्षेत राहून काम करतील आणि सोसायटीकडून निश्चित नियमांचे पालन देखील करतील.
या राज्यांमध्ये होणार स्थापना
21 नव्या सैनिक शाळा आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा-नगर हवेली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंडमध्ये स्थापन केल्या जाणार आहेत.