सैन्य अन् निमलष्करी दलामधील लढाई सुरूच
वृत्तसंस्था/ खार्तुम
उत्तर आफ्रिकेतील देश सूदानमध्ये मागील 3 महिन्यांपासून सैन्य आणि निमलष्करी दलामधील लढाई सुरूच आहे. राजधानी खातुर्मनजीक ओमडुरमॅन शहरात हवाई हल्ले करण्यात आले असून यात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. हे हवाई हल्ले शहरी भागात झाले असून हा आतापर्यंतचे सर्वात भीषण हल्ला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
निमलष्करी दल आरएसएफने सूदान सैन्याला याकरता जबाबदार ठरविले आहे. आरएसएफनुसार या हल्ल्यात 31 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हवाई हल्ल्यात सैन्याने नागरी वस्तीला लक्ष्य केले आहे. सूदानचे सैन्य प्रमुख अब्देल फतह अल-बुरहान हे दहशतवादी हल्ला घडवून आणत देशाच्या जनतेला लक्ष्य करत असल्याचा आरोप आरएसएफने केला आहे.
विमान अन् ड्रोन्सचा वापर
मागील अनेक दिवसांपासून सैन्य स्वत:च्या विमानांद्वारे आरएसएफला या क्षेत्रात लक्ष्य करत आहे. तर आरएसएफ देखील सातत्याने सैन्यावर ड्रोनद्वारे हल्ले घडवून आणत आहे. हवाईहल्ल्यांपूर्वी सैन्याने आरएसएफच्या अनेक तळांना लक्ष्य केले होते. यादरम्यान स्वत:ला वाचविण्यासाठी आरएसएफच्या सदस्यांनी नागरिकांच्या घरात आश्रय घेतला होता. आरएसएफने देखील विमानविरोधी यंत्रणेद्वारे लढाऊ विमानांवर हल्ले केले आहेत.
आतापर्यंत 1,133 जणांचा मृत्यू
मागील काही दिवसांपासून सैन्य आणि निमलष्करी दलात ओमडुरमॅन शहरात लढाई सुरू आहे. या शहराचा पश्चिम भाग आरएसएफसाठी मोठा पुरवठामार्ग आहे. येथूनच आरएसएफला डार्फरमधील स्वत:च्या तळापर्यंत पोहोचता येते. 15 एप्रिल रोजी सुरू झालेल्या या लढाईत आतापर्यंत 1,133 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 30 लाख लोकांनी पलायन केले आहे. यातील सुमारे 7 लाख लोकांनी शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतला आहे.