मंत्रिस्तरीय चर्चा होणार : विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी दोन्ही मंत्री पोहोचण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग आणि संरक्षणमंत्री तथा उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स सोमवारी टू-प्लस-टू (2+2) मंत्रिस्तरीय चर्चेत भाग घेण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत. सोमवारी ही चर्चा होणार असून त्यापूर्वी रविवारी अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना होत आहे. हा सामना पाहण्यासाठी दोघेही मंत्री भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या टू-प्लस-टू संवादातून दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या टू-प्लस-टू संवादात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करतील. टू-प्लस-टू मंत्रिस्तरीय संवादामध्ये दोन्ही बाजूंनी संपूर्ण संरक्षण आणि सुरक्षा संबंध आणखी वाढवण्यावर आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात धोरणात्मक सहकार्याला चालना देण्यावर व्यापकपणे लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण आणि धोरणात्मक संबंध गेल्या काही वर्षांमध्ये अधिक वृद्धिंगत झाले आहेत. त्याच अनुषंगाने सप्टेंबर 2021 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टू-प्लस-टू मंत्रिस्तरीय संवादाला प्रारंभ झाला होता. अमेरिका आणि जपानसह मोजक्मयाच देशांशी चर्चा करण्यासाठी भारताकडे अशी चौकट आहे. भारत-अमेरिका परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रिस्तरीय चर्चा 10 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे पार पडली होती.