पोलिसांनी सापळा रचून पकडला कंटेनर
चिपळूण
तब्बल 24 लाख रूपये किमतीची गोवा बनावटीची बेकायदा दारु कंटेनरमधून नाशिकच्या दिशेने घेऊन जाणाऱयास चिपळूण पेलिसांनी मंगळवारी रात्री 1.45 च्या सुमारास सापळा रचून मुंबई-गोवा मार्गावरील कळंबस्ते या ठिकाणी पकडले. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकास ताब्यात घेतले आहे. कंटेनरमध्ये 891 दारुचे खोके होते. या दारुसह 10 लाखाचा कंटेनर असा एकूण 34 लाख 45 हजार 72 रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
बाबासाहेब सुखदेव बुदवंत (44, मुळशी, ता. हवेली, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या कंटेनर चालक व मालकाचे नाव आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन सण, उत्सव्यादरम्यान राजरोसपणे गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होत असल्याची ओरड होत होती. अधूनमधून पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. यामुळे बेकायदा गोवा बनावटीची वाहतूक थांबली असतानाच पुन्हा एकदा पोलिसांनी कंटेनर पकडला.
गोव्याहून नाशिकच्या दिशेने दारु घेऊन कंटेनर चिपळूणहून पुढे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कळंबस्ते येथे मंगळवारी मध्यरात्री 1.55 च्या सुमारास सापळा रचला. कंटेनर थांबवला असता प्रारंभी चालकाने पोलिसांना उलटसुलट माहिती दिली. कंटेनरचे सील तोडले असता त्यात तब्बल 24 लाख रूपये किंमतीचे 891 दारुचे खोके आढळले. यात 198 बिअरचे, 48 व्हीस्कीचे व अन्य दारुच्या खोक्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दारुसह कंटेनर जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पप्या चव्हाण यांच्यासह 7 ते 8 पोलिसांच्या पथकाने केली.