पूर्वीच्या काळी (विमाने नव्हती त्यावेळी) एका देशातून दुसऱया देशात जाण्यासाठी जमीन किंवा समुद्र हे दोनच मार्ग उपलब्ध होते. समुद्र पर्यटन हे शास्त्र आणि कला त्या काळात विकसित झाली होती. आज समुद्र पर्यटन केवळ आनंदासाठी केले जाते. पण काही वेळा हा आनंदही जीवघेणा ठरू शकतो. युरोपियन देशांमध्ये नौकानयन नामक नवा क्रीडा प्रकार विकसित झालेला आहे. अनेक लोक जलपर्यटनासाठी नौकानयन करतात. 47 वर्षांचे एल्विस फ्रँक्वॉईस नौकानयनाच्या क्रीडा प्रकारात वाकबगार आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे डिसेंबर 2022 मध्ये सेंट मार्टिन बेटापासून नावेने प्रवास सुरू केला होता. पण अचानक त्यांची नाव कॅरिबियन समुद्रात भरकटली. त्यांच्या काही लक्षात येण्याच्या आतच ती समुद्र प्रवाहात सापडून बरीच दूर गेली. त्यामुळे भर समुद्रात ते एकटे पडले.
त्यांच्या नावेत खाण्या-पिण्यासाठी केचप सोडून कोणतीही सामग्री नव्हती. नावेवर दिशादर्शक यंत्रही नव्हते. त्यामुळे जमिनीकडे परत येण्याची त्यांची शक्मयता जवळपास मावळली होती. आता केवळ त्यांना दैवावरच विसंबून रहावे लागणार होते. त्यांच्याकडे मोबाईल होता, परंतु नेटवर्क मिळत नव्हते. त्यामुळे आपल्या मित्रांबरोबर ते संपर्क करू शकले नाहीत. अशाप्रकारे त्यांनी तब्बल 24 दिवस समुद्रात घालविले. भूक भागविण्यासाठी त्यांना थोडे थोडे केचप खावे लागले. बाकी कोणताही पदार्थ उपलब्ध नव्हता. अशा अवस्थेच्या 24 व्या दिवशी त्यांना आकाशात हेलिकॉप्टर उडताना दिसले. सुदैवाने हे हेलिकॉप्टर कोलंबियाच्या नौदलाचे होते. ते जमिनीपासून फार उंचावरून उडत नव्हते. त्यामुळे हेलिकॉप्टरमधील नौसैनिकांना ही भरकटलेली नाव दृष्टीस पडली. त्यांनी ताबडतोब कृती करून फ्रँकॉईस यांना वर उचलून घेतले आणि त्यांचा जीव वाचला. जे केचप खावून त्यांनी 24 दिवस तग धरला ते हाईन्स या कंपनीचे होते. या कंपनीने त्यांना नंतर साहाय्याचा हात दिला. याच कंपनीने सोशल मीडियावर या प्रकाराची माहितीही प्रसारित केली. त्यांच्या केचपची जाहिरात करण्यासाठी त्यांना हा प्रसंग उपयोगी पडला. अशातऱहेची घटना जगातील आतापर्यंतची पहिलीच असावी.