ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सर्वात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत 2500 कोटी रुपयांचे 350 किलो हेरॉईन जप्त केले. याप्रकरणी 3 आरोपींना हरियाणातून तर एका आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. विशेष कक्षाचे पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
नीरज ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नार्को टेररिझमशी संबंधित असू शकते. हे हेरॉईन कंटेनरमध्ये लपवून मुंबईहून दिल्लीत आणण्यात आले होते. मध्य प्रदेशातील शिवपुरीजवळील कारखान्यात या ड्रग्जवर प्रक्रिया करण्यात येणार होती. त्यानंतर हे ड्रग्ज पंजाबला पाठविण्यात येणार होते. त्यासाठी फरीदाबादमध्ये एक घरही भाडय़ाने घेण्यात आले होते. अफगाणिस्तानातील माफीया या ड्रग्जची वाहतुक ऑपरेट करत होते.