ऑनलाईन टीम / तरुण भारत :
लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/ 11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की याला संयुक्त राष्ट्र परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
मक्की हा पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा आहे. त्याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे. मक्कीने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणे, तरुणांना हल्ल्यासाठी प्रवृत्त करणे, भारताविरुद्ध विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. भारत आणि अमेरिकेने यापूर्वीच मक्कीला त्यांच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते.
दरम्यान, सोमवारी झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने अब्दुल रहमान मक्कीला आतंरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकले. मक्कीला पैशाचा मोठा व्यवहार करता येणार नाही. शस्त्रे खरेदी करण्याचा त्याला कोणताही अधिकार नसेल, तसेच त्याच्या प्रवासावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव भारताने मागच्या वर्षी मांडला होता. मात्र, चीनने त्याला पाठीशी घातले होते. त्यावरुन भारताने चीनला फटकारले होते.