कंपनीकडून नव्या आयटी नियमाच्या अंतर्गत कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नवे आयटी नियम, 2021 अंतर्गत सप्टेंबर महिन्यात भारतातील 26 लाखाहून अधिक व्हॉट्सऍप अकौंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती मेटाचे मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍपने मंगळवारी दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना उत्तरदायी ठरविण्यासाठी नवे आयटी नियम लागू करण्यात आले आहेत.
व्हॉट्सऍपचे देशात कोटय़वधी वापरकर्ते आहेत. भारतात सप्टेंबरमध्ये व्हॉट्सऍपला 666 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आयटी नियम 2021 नुसार कंपनीने सप्टेंबर महिन्यासाठी स्वतःचा अहवाल प्रकाशित केला आहे. यात वापरकर्ते-सुरक्षा अहवालात प्राप्त तक्रारी आणि व्हॉट्सऍपकडून करण्यात आलेल्या संबंधित कारवाईसह कंपनीकडून स्वतःहून करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील नमूद आहे.
व्हॉट्सऍपकडून ऑगस्ट महिन्यात भारतात 23 लाखाहून अधिक अकौंट्सवर बंदी घालण्यात आली होती. नव्या आयटी नियमानुसार 5 दशलक्षाहून अधिक युजर्स असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मासिक अहवाल प्रकाशित करावा लागतो.
ट्विटरकडूनही कारवाईचा बडगा
ट्विटरने 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबरदरम्यान लैंगिक शोषण आणि न्यूडिटी यासारख्या सामग्रीला चालना देणाऱया 52,141 भारतीय अकौंट्सवर बंदी घातली आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची आता एलन मस्क यांनी खरेदी केली आहे. या प्लॅटफॉर्मने देशात दहशतवादाला बळ पुरवू पाहणाऱया 1,92 अकौंट्सनाही हटविले आहे. ट्विटरने नव्या आयटी नियमाच्या अंतर्गत सादर करण्यात आलेल्या स्वतःच्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे. ट्विटरला भारतीय युजर्सकडून 157 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.