सियाम संस्थेची माहिती ः एकूण निर्यात 1 लाख 60 हजारावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये पॅसेंजर कारच्या निर्यातीमध्ये 26 टक्के वाढ नोंदली गेली असल्याची माहिती ऑटो क्षेत्रातील कंपनी सियाम यांनी नुकतीच दिली आहे. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये 1 लाख 60 हजार 263 वाहनांची निर्यात करण्यात आली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये याच कालावधीमध्ये 1 लाख 27 हजार 83 वाहनांची निर्यात केली गेली होती. मागच्या आर्थिक वर्षामध्ये कोरोना महामारीमुळे ऑटो उद्योगाला संकटाचा सामना करावा लागला होता. कमी मागणी, पुरवठय़ात अडथळे या धर्तीवर वाहनांच्या निर्यातीवर परिणाम दिसला होता.
मारुतीची निर्यातीत आघाडी
एप्रिल ते जून या कालावधीमध्ये मारुती सुझुकी इंडियाने सर्वाधिक कार्सची निर्यात केली आहे. मारुती सुझुकीने 68 हजार 987 प्रवासी वाहनांची निर्यात केली आहे, जी मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेमध्ये 53 टक्के अधिक आहे. मारुती सुझुकीने मागच्या आर्थिक वर्षामध्ये समान अवधीत 45 हजार वाहनांची निर्यात केली होती. दुसरीकडे किया इंडियाने 21 हजार 459 वाहनांची विविध देशांना निर्यात केली आहे.
मारुती सुझुकीने लॅटिन अमेरिका, आफ्रिका, मध्य आशिया आणि जवळपासच्या देशांना आपल्या बलेनो डिझायर स्विफ्ट, एसप्रेसो आणि ब्रिझा यासारख्या कार्सची निर्यात करण्यामध्ये यश मिळवले आहे. निस्सान मोटर इंडियाने 11 हजार 419 वाहनांची निर्यात केली असून फोक्सवॅगन कंपनीने 7140 वाहनांची निर्यात केली आहे. तर रेनॉ व होंडा यांनी अनुक्रमे 6,658, 6533 वाहनांची निर्यात केली आहे.