केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती
नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिला उद्योजकांसाठी जवळपास 27 कोटी रुपयांचे कर्ज प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत वितरीत केले आहे.
मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी पीएम मुद्रा योजनेची सुरुवात केली होती. ही योजना लागू करण्याचा उद्देश बिगर कॉर्पोरेट, कृषी लघू आणि सुक्ष्म उद्योगासाठी 10 लाख रुपये इतके कर्ज देणे हा आहे. गेल्या 9 वर्षाच्या काळात महिलांनी अंतराळ, स्टार्टअप, संरक्षणसह इतर क्षेत्रात प्रगती साधली आहे. साधारणपणे भारतामधील महिला उद्योजकांना जवळपास 27 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करुन त्यांना सक्षम केले आहे. आजच्या घडीला भारतीय अर्थव्यवस्था सशक्त होण्यामध्ये महिलांचा वाटाही लक्षणीय राहात असल्याचा विश्वास शहा यांनी व्यक्त केला आहे.
पीएमएमवायअंतर्गत दिलेली कर्जे मुद्रा कर्जे मानली जातात. ही कर्जे व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, संस्था व बिगर बँकिंग वित्त संस्थांकडून महिला उद्योजकांना वितरीत केली जातात.