एका सैनिकाचा मृत्यू : रशियाकडून पहिल्यांदाच कबुली
रशिया-युक्रेन युद्धात काही दिवसांपूर्वी पुतीन यांना मोठा झटका बसला होता. रशियाच्या सैन्याचा गौरव म्हणून मानली जाणारी युद्धनौका मोस्कवा काळय़ा समुद्रात नष्ट होऊन बुडाली होती. रशियाने आता पहिल्यांदाच यातील जीवितहानीचा खुलासा केला आहे. युद्धनौकेवर आग लागल्याने आणि ती बुडाल्याने एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण बेपत्ता असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. मोस्कवा मिसाइल क्रूजरला लक्ष्य करण्याच्या युक्रेनच्या मोहिमेत तुर्कस्ताकडून निर्मित ड्रोन सामील होता.
मागील आठवडय़ात मोस्कवा युद्धनौकेवर आग लागल्याने एका नौसैनिकाचा मृत्यू झाला, तर 27 जण बेपत्ता असून 396 जणांना वाचविण्यात आल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. युद्धनौका बुडाल्याच्या एका आठवडय़ाने हे वक्तव्य करण्यात आले आहे. तर युद्धनौका बुडाल्याच्या काही तासांनी रशियाकडून सर्व नौसैनिकांना वाचविण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
युद्धनौकेवर क्षेपणास्त्राने हल्ला केला होता असे युक्रेनने म्हटले होते. तर युद्धनौकेवरील दारूगोळय़ाने पेट घेतल्याने आग लागली होती असे रशियाकडून सांगण्यात आले होते.
युक्रेनने तुर्कस्तानकडून 100 बायरकटार टीबी2 ड्रोन खरेदी केले होते. पूर्व युक्रेनमध्ये रशियाचे समर्थनप्राप्त बंडखोरांना लक्ष्य करण्यात आल्यावर हा ड्रोन चर्चेत आला होता. त्यानंतर या ड्रोनद्वारे युक्रेनच्या सैन्याने अनेकदा रशियाच्या सैन्यताफ्याला लक्ष्य करण्यात आले आहे.