देशभरात 5 जी सेवेचा होणार विस्तार : सेवा शुल्क वाढीचे संकेत
नवी दिल्ली : भारतातील दूरसंचार कंपनी भारती एअरटेल आगामी काळामध्ये आपल्या 5 जी सेवा नेटवर्क विस्तारासाठी साधारण 27 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती आहे. कंपनीच्या अधिकाऱयांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. 5 जी सेवेचा विस्तार जास्तीत जास्त शहरांमध्ये करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न आगामी काळात राहणार असून या संदर्भातल्या भांडवल खर्चासाठी साधारण दहा ते पंधरा टक्के इतकी वाढ केली जाणार असल्याचे नियोजन कंपनीने केले आहे.
5जी सेवेचा विस्तार करण्यासाठी गेल्या तीन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यात आली असून 5जी सेवा अधिक गतीने सर्वदूर पोहोचावी यासाठी 27 ते 28 हजार कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. याअंतर्गत हा खर्च रेडिओ (मोबाइल अँटेना), फायबर, ब्रॉडबँड, एंटरप्राइज टेक्नॉलॉजी डाटा केंदे यांच्यासाठी केला जाणार आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत भारती एअरटेलने 3293 बेस स्टेशन्सची निर्मिती केली आहे.
शुल्कात वाढीची शक्यता?
याच दरम्यान 5जी सेवेकरताच्या शुल्कामध्ये वाढ केली जाणार असल्याचे संकेतही व्यक्त केले जात आहेत. बाजारातील परिस्थितीनुसार सेवेसंदर्भातील शुल्क वाढवण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.