प्रतिनिधी / मडगाव
केंद्र सरकारने गेल्या वर्षापासून ‘अग्निवीर’ योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत नावेली-मडगाव येथील ‘थ्री मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट’ मध्ये दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आज शुक्रवार दि. 29 रोजी 1900 अग्निवीरांचा दीक्षांत सोहळा होणार आहे.
आजच्या दीक्षांत सोहळ्याला दुपारी 12.45 वा. प्रारंभ होईल. 2 ऑगस्ट रोजी 1422 अग्निवीरांची पहिली तुकडी प्रशिक्षित झाली होती. विशेष म्हणजे अग्निवीरांना गोव्यात नावेली येथे प्रशिक्षण दिले जात असले तरी गोव्यातील एकही युवक अग्निवीर म्हणून पुढे आलेला नाही. गोव्यातील युवकांनी अग्निवीर म्हणून पुढे यावे यासाठी बरेच प्रयत्न झाले होते. पण त्या प्रयत्नांना यश आलेले नाही.
देशाच्या विविध भागांतून भरती झालेले 1900 अग्निवीर नावेलीच्या थ्री मिलिटरी प्रशिक्षण रेजिमेंटमधून प्रशिक्षित झालेले आहेत. या प्रशिक्षणाला 1 जानेवारीला प्रारंभ झाला होता. ते 31 जुलै रोजी पूर्ण झाले. आज होणाऱ्या दीक्षांत सोहळ्यानंतर हे अग्निवीर भारतीय सैन्यात दाखल होतील व देशाच्या विविध भागात देशसेवा करतील.