मागील वषीचा विक्रम मोडला, अजूनही 34 दिवस बाकी, यंदा सर्वाधिक भाविकांची नोंद होणार
वृत्तसंस्था/ अमरनाथ, जम्मू
श्री अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत सुमारे 3.69 लाख यात्रेकरूंनी पवित्र हिमलिंगाचे दर्शन घेतले आहे. आतापर्यंतच्या दर्शन घेतलेल्या भाविकांच्या आकड्याने हा नवा विक्रम प्रस्थापित केला असून गेल्यावर्षीच्या एकूण भाविकांचा टप्पाही पार केला आहे. 1 जुलैपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून यंदाचा कालावधी सर्वाधिक आहे. अजूनही जवळपास 34 दिवस यात्रा चालणार असून भाविकांच्या आकडेवारीचे सर्व विक्रम पादाक्रांत केले जातील, असा दावा श्राईन बोर्डाकडून करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या यात्रामार्गात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पुन्हा यात्रेकरूंची संख्या वाढत आहे. ‘हर हर महादेव’ चा जयघोष करत 3,111 शिवभक्तांचा जत्था गुऊवारी पहलगाम आणि बालटालसाठी जम्मूतील भगवती नगर यात्री निवास येथून कडक सुरक्षेत रवाना झाला. 1 जुलैपासून सुरू झालेल्या यात्रेच्या 25 व्या तुकडीत 2,154 यात्रेकरू पहलगाम आणि 957 यात्रेकरू बालटालसाठी रवाना झाले. कडेकोट सुरक्षेत 124 वाहनांमधून निघालेले यात्रेकरू संध्याकाळी पहलगाम आणि बालटाल बेस पॅम्पवर पोहोचले.
अमरनाथ यात्रेत सहभागी होण्यासाठी दररोज 5 ते 6 हजार यात्रेकरू जम्मूला पोहोचतात. देशाच्या अनेक भागात पाऊस आणि पुरामुळे यात्रेकरूंच्या संख्येत किंचित घट झाली असली तरी हवामान स्वच्छ झाल्यानंतर यात्रेकरूंची संख्या आणखी वाढेल, असे श्री अमरनाथ श्राईन बोर्डाचे अधिकारी आणि प्रशासनाचे म्हणणे आहे.