काही तासातच हल्लेखोराला कंठस्नान
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इजिप्तच्या सीमेवर इस्रायलच्या 3 सैनिकांची एका युवकाने शनिवारी सकाळी हत्या केली. मृतांमध्ये एका महिला सैनिकाचाही समावेश आहे. या तिन्ही सैनिकांशी संपर्क न झाल्याने पोलीस अधिकारी त्यांना शोधत सीमावर्ती भागात पोहोचल्यावर तिघांचे मृतदेह सापडले होते.
इस्रायलमध्ये अमली पदार्थ तस्करांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेशी या हत्यांचा संबंध असल्याचे बोलले जात आहे. 3 सैनिकांच्या हत्येपूर्वी इजिप्त अन् इस्रायलच्या सीमेवर अमली पदार्थ तस्करांच्या विरोधात मोहीम राबविण्यात आली होती.
हल्लेखोर हा इजिप्तचा पोलीस कर्मचारी होता असे समजते. इजिप्त याप्रकरणी चौकशी करत आहे. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसने शनिवारी एका मोहीम राबवून 12 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. डिफेन्स फोर्सेसने हत्या झालेल्या सैनिकांची ओळख जाहीर केलेली नाही. हल्लेखोर इस्लामिक जिहाद संघटनेचा सदस्य देखील असू शकतो असे इस्रायलच्या संरक्षण दलाने म्हटले आहे.
इस्रायल दीर्घकाळापासून अमली पदार्थ अन् शस्त्रास्त्र तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती भागांमध्ये मोहीम राबवत आहे. याच्या अंतर्गत दोन आठवड्यांपूर्वी जॉर्डनच्या एका खासदाराला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून शस्त्रास्त्रs अन् सोने हस्तगत करण्यात आले होते. खासदार इमाद अल-अदवानवर पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनांना बळ पुरविण्याचे आरोप आहेत.