सरकारचा लाखो रुपयांचा कर बुडीत : परवान्यांचे नूतनीकरण नाहीच : मात्र परवानाधारक क्वॉरी चालकांना फटका
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील 30 क्वॉरी चालकांनी परवान्यांचे नूतनीकरणच केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या क्वॉरींचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी सक्त ताकीद दिली आहे. याबाबत पत्रकही काढले आहे. तरीदेखील हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांचा वीजपुरवठा खंडित केला नसल्याने या क्वॉरी सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. आता याकडे जिल्हाधिकारी स्वत: लक्ष देणार का? असा प्रश्न कायदेशीररित्या सुरू असलेल्या क्वॉरी चालकांनी उपस्थित केला आहे. क्वॉरी सुरू करताना विविध विभागांकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना घेतल्यानंतर त्याचे नूतनीकरणही केले पाहिजे. तालुक्यात एकूण 60 क्वॉरी आहेत. मात्र त्यामधील 30 क्वॉरी चालकांनी परवान्यांचे नूतनीकरणच केले नाही. त्यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे रितसर परवानगी घेऊन क्वॉरी चालविणाऱ्या चालकांना फटका बसत आहे. त्यामुळे याकडे अधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. क्वॉरी सुरू करताना पर्यावरण विभाग, संबंधित ग्राम पंचायत, हेस्कॉम, भूगर्भ खाते यांच्याकडून परवानगी घेतली जाते. परवानगी घेतल्यानंतर काही वर्षांनी त्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र बरेचजण नूतनीकरण करत नाहीत. त्यामुळे सरकारचा कर बुडत आहे. सरकारला एक पैसाही कर द्यावा लागत नसल्यामुळे संबंधित क्वॉरी चालक कमी दराने खडी विक्री करत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. मात्र या प्रकारामुळे नियमानुसार क्वॉरी चालविणाऱ्या चालकांना फटका बसू लागला आहे.
जिलेटीनचाही बेकायदेशीर वापर
हेस्कॉमकडून वीज कनेक्शन देताना सर्व कागदपत्रे तपासली जातात. परवान्याचे नूतनीकरण झाले नाही तर हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा बंद केला पाहिजे. मात्र परवान्याची मुदत संपल्यानंतरही हेस्कॉमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वीजजोडणी तशीच ठेवली आहे. त्यामध्येही गैरप्रकार होत असल्याचा आरोप इतर क्वॉरी चालक करत आहेत. बऱ्याचवेळा काही क्वॉरींचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर जनरेटरच्या साहाय्याने क्वॉरी सुरू करून उत्पादन घेत आहेत. जिलेटीनचाही बेकायदेशीररित्या वापर केला जात आहे. त्यामुळे परिसरातील घरांना आणि वस्त्यांना फटका बसत आहे. तेव्हा तातडीने त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी होत आहे. याबाबत काहीजणांनी तक्रारी केल्या आहेत. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जर संबंधित बेकायदेशीर क्वॉरींवर कारवाई झाली नाही तर त्याविरोधात कायदेशीर सुरू असलेल्या क्वॉरी चालकांनी बंद पुकारण्याचा इशाराही दिला आहे.
खडी विक्री करताना गोलमाल…
खडी विक्री करताना कारवार किंवा इतर दूरच्या जिल्ह्यामध्ये खडी विक्री करत असल्याचा पास घ्यायचा. मात्र बेळगाव परिसरातच खडी विकायची, असे प्रकार घडत आहेत. कारण कारवारला जाण्यासाठी अधिक उशीर लागत असतो. त्यामुळे त्यावर वेळेची नोंद केली जाते. त्यावेळेत बेळगाव परिसरात दोन ते तीन ठिकाणी खडी पोहोचवायची आणि दुप्पट फायदा मिळवायचा, असा प्रकारही सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. इतर जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जातो. त्याचा फायदा काही चालक घेत असल्याचे आढळून आले आहे. एकूणच यामध्ये मोठा गैरप्रकार सुरू असून त्याची चौकशी करावी, अशी मागणीही होत आहे.