सौदी राजघराण्याशी संबंधित रक्कम – स्वतःकडून आयोजित गुंतवणूक परिषदेत गैरहजर
वृत्तसंस्था / रियाध
सौदी राजघराण्याकडून जगभरात करण्यात आलेल्या गुंतवणुकीची देखरेख करणारे यासिर अल-रुमायन हे संशयास्पद पद्धतीने गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. यासिर हे सौदी राजघराण्याच्या सुमारे 450 अब्ज डॉलर्सच्या (सुमारे 33.6 लाख कोटी रुपये) पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडची जबाबदारी सांभाळतात. सौदी अरेबियाच्या शासनाच्या वतीने अन्य देशांमध्ये गुंतवणूक करण्याचे काम पब्लिक इन्व्हेस्टमेंड फंड पार पाडत असतो.
सौदी अरेबियाकडून रियाधमध्ये आयोजित वार्षिक गुंतवणूक परिषदेचे यजमानपद यासिर यांच्याकडे होते. या परिषदेला जगभरातून मोठमोठय़ा कंपन्यांचे प्रमुख पोहोचले होते. पण या परिषदेत यासिरच अनुपस्थित राहिले तसेच गोल्डमॅन सॅश आणि मनी मॅनेजमेट कंपनी ब्लॅकरॉकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांसोबत होणाऱया चर्चासत्रातही त्यांनी भाग घेतला नाही.
गुंतवणुकदारांमध्ये खळबळ
यासिर यांच्या अनुपस्थितीमुळे सौदी अरेबियात गुंतवणूक केलेल्या तसेच सौदी सॉवरेन फंडकडून गुंतवणूक झालेल्या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सौदी राजघराणे स्वतःच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडला स्वतःच्या नियमांच्या अंतर्गत संचालित करते, म्हणजेच यात पारदर्शकता बाळगण्यास त्यांचे प्राधान्य नसते, याचमुळे या कंपन्यांना पूर्वीच चिंता सतावत आहे.
सौदी राजघराण्याकडून मौन
यासिर यांच्या अनुपस्थितीत सर्वात संशयास्पद बाब म्हणजे कुणीच याचे स्पष्ट कारण सांगू शकत नसल्याची स्थिती आहे. गुंतवणूक परिषदेचे कामकाज पाहणाऱया फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या अधिकाऱयांनी याचे कारण सौदी सरकारला माहित असणार असे म्हटले आहे. तर पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडचे ग्लोबल कम्युनिकेशन्स प्रमुख केविन फोस्टर यांनी यासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आहे. सौदी राजघराण्याकडून यासिर यांच्या अनुपस्थितीबद्दल कुठलेच विधान जारी करण्यात आलेले नाही.
कोरोनाबाधित असल्याची अफवा
पण यासिर गायब असण्यामागे ते कोरोनाबाधित असल्याची अफवा देखील पसरू लागली आहे. गुंतवणूक परिषदेत सामील झालेल्या 4 व्यक्तींनी यासिर यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे म्हटले आहे. पण त्यांच्या दाव्याची पुष्टी होऊ शकलेली नाही.
यासिर बेपत्ता होण्याची घटना महत्त्वपूर्ण
-सौदी राजघराण्याच्या 33 लाख कोटींच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडची जबाबदारी सांभाळतात यासिर
-फंडचा अहवाल थेट सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांना देतात
-फंडकडून गुंतवणूक प्राप्त करू पाहणाऱया विदेशी कंपन्यांच्या संपर्कात राहतात यासिर
-या विदेशी कंपन्यांच्या संचालक मंडळात सौदी राजघराण्याचे प्रतिनिधित्व करतात.
-आंतरराष्ट्रीय स्तरावर सौदी अरेबियाची सॉफ्ट इन्व्हेस्टर प्रतिमा निर्माण करण्याचे कार्य