राहण्यासाठी उत्तम घराची सुविधा
आमच्या देशात बेरोजगारी अन् लोकसंख्या अधिक असल्याने लोक नोकरी मिळविण्यासाठी जगाच्या कानाकोपऱयात जाण्यासही तयार असतात. सद्यकाळात प्रत्येक ठिकाणी भारतीय लोकांची उपस्थिती कुठल्या न कुठल्या प्रकारे आहे. परंतु काही ठिकाणं अशी आहेत, जेथे लोक कर्मचारी मिळावेत म्हणून झगडत आहेत. चांगला पगार आणि राहण्यासाठी जागा असून देखील तेथे कुणीच कामावर येण्यास तयार नाही.
चांगल्या नोकरीच्या शोधात लोक कुठेही पोहोचत असतात. परंतु एका ठिकाणी नोकरीसाठी भरभक्कम पगारासह उत्तम घराची ऑफर दिली जात आहे, तरीही तेथे जॉब करण्यासाठी कुणीच तयार नाही. प्रत्यक्षात ही नोकरी एका डॉक्टरसाठी असल्याने मूलभूत पात्रता आवश्यक आहे, जर कुणाकडे वैद्यकीय शिक्षणाची पदवी असेल तर ऑस्ट्रेलियात त्याला ही नोकरी मिळू शकते.
ऑस्ट्रेलियातील दुर्गम गाव क्वाइरॅडिंगमध्ये ही नोकरी आहे. या छोटय़ा गावात जनरल प्रॅक्टिस करणाऱया डॉक्टरची गरज आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियातील या गावात डॉक्टरला 4 कोटी 60 हजारांहून अधिक वार्षिक पॅकेजची ऑफर देण्यात येत आहे. तसेच त्याला राहण्यासाठी 4 बेडरुमचे उत्तम घर मिळणार आहे. हे गाव पर्थ शहरापासून 170 किलोमीटर अंतरावर आहे. येथे कित्येक वर्षांपासून जनरल पॅक्टिशनरची कमतरता आहे. या गावात 600 लोकांचे वास्तव्य आहे, परंतु त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कुठलाही डॉक्टर किंवा मेडिकल स्टोअर नाही.
डॉक्टर नसल्याने त्रस्त
ऑस्ट्रेलियाच्या सरकारने ग्रामस्थांची गरज पाहता या ठिकाणी 2 वर्षांपर्यंत राहणाऱया डॉक्टरला भरभक्कम वेतन देण्याची तयारी दर्शविली आहे. तरीही गावांमध्ये जाण्यास कुठलाच डॉक्टर तयार होत नसल्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलियन मेडिकल असोसिएशननुसार 2031 पर्यंत ऑस्ट्रेलियात 11 हजार डॉक्टर्सची कमतरता भासणार आहे.