वृत्तसंस्था /पॅरिस
फ्रान्समध्ये एका भीषण चाकू हल्ल्यात 4 बालके गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या देशाच्या अॅनेसी या उपनगरात एका पार्कमध्ये ही मुले खेळत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला झालेल्या मुलांची वये 22 महिने ते 3 वर्षे अशी आहेत. ही सर्व मुले गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणी एका सिरियन वंशाच्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव घोषित करण्यात आलेले नाही. तो स्वीडनमध्ये राहणारा निर्वासीत आहे, अशी माहिती फ्रान्सच्या पंतप्रधान एलिसाबेथ बोर्न यांनी दिली. या हल्ल्यात काही प्रौढ वयाची माणसेही जखमी झाली आहेत. दोन बालके आणि एका प्रौढ व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या व्रूर हल्ल्याची व्हिडीओग्राफी सोशल मिडियावरही प्रसारित करण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे फ्रान्समध्ये संतापाची लाट उसळली आहे. काळा गॉगल लावलेला आणि चेहरा झाकलेला एक व्यक्ती अनेकांना चाकूने भोसकत असल्याचे या व्हिडीओत दिसून येत आहे. तो हल्ला करताना ‘ऑन द नेम ऑफ झीजस क्राईस्ट’ असे ओरडताना दिसतो. मात्र, त्याने हे वाक्य त्याची ओळख लपविण्यासाठी आणि उपस्थितांची दिशाभूल करण्यासाठी म्हटल्याचीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याने चाकू उगारल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा आणि साहाय्यासाठी किंकाळ्या फोडणे सुरु केले. तथापि, त्याने चार बालकांसह किमान आठ जणांना भोसकले. नंतर शांतपणे तो पार्कच्या बाहेर पडला. नंतर त्याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात येत आहे.