आरोग्य कर्मचाऱयांचेच समूपदेशन करण्याची वेळ
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना लसीकरणाबाबत अद्यापही आरोग्य कर्मचाऱयांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे. जिल्हय़ात रत्नागिरी आणि दापोली वगळता इतर तालुक्यात लसीकरणाला तुलनेने चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही 40 टक्के आरोग्य कर्मचाऱयांनी लसीकरणाला नकार दिला आहे. त्यामुळे दररोज कर्मचाऱयांचेच समूपदेशन करण्याची वेळ आल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हय़ात कोव्हिड लसीचे 16 हजार 330 उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यात 1 हजार 500 कर्मचाऱयांना कोरोना लस देण्यासाठी यादी तयार करण्यात आली आहे. मुळात दिवसाला 500 कर्मचाऱयांना लस देण्याचे उद्दीष्ट आहे. शुक्रवारी 297 कर्मचाऱयांनीच लस घेतली. आतापर्यंत जिल्हय़ात एकूण 1 हजार 94 कर्मचाऱयांना लस देण्यात आली आहे. हा प्रतिसाद आणखीन वाढणे आवश्यक असल्याने वारंवार समूपदेशन सरु आहे. रत्नागिरी तालुका आणि दापोलीत अत्यल्प प्रतिसाद असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.
डॉ. संघमित्रा फुले यांनाही घेतली कोरोना लस
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी डॉ. संघमित्रा फुले यांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे त्यांनी लस घेतली नव्हती, मात्र शुक्रवारी त्यांनी लस घेतली असून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याचे त्यांनी सांगितले. समूपदेशन करण्याची वेळ येणे ही बाब दुर्देवी आहे. बहुतांश कर्मचारी स्वतःहून लस घेत असताना 40 टक्के कर्मचाऱयांमध्ये या बाबत उदासीनता दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
20 टक्के डोस वाया
कोरोना लसीकरणासाठी 10 लसीचा लॉट असतो. लस उघडल्यावर एकाचवेळी दहाजणांना ती द्यावी लागते. हा दहाचा लॉट चार तासाच्या आत संपवयाचा असतो. मुळात लसींची एक्सपायरी डेट एप्रिलमध्ये आहे. जिह्यात आजपर्यंत चारवेळा झालेल्या लसीकरणात एकावेळी आवश्यक असलेले कर्मचारी उपस्थित नसल्याने सुमारे 20 टक्के लस वाया गेल्याची माहिती समोर आली आहे.