युएईतील ‘साप्ताहिक सोडत’मध्ये पाच भारतीयांना मोठा धनलाभ
वृत्तसंस्था/ दुबई
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) नोव्हेंबर महिना काही भारतीयांसाठी पैशांचा मोठा धनलाभ घेऊन आला. यापैकी केरळमधील रहिवासी असलेल्या 39 वषीय श्रीजूला लॉटरीत 2 कोटी युएई दिरहमचे (45 कोटी रूपये) पहिले बक्षीस मिळाले आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक भारतीयांनाही लॉटरीत लाखो रुपयांची कमाई झाली आहे. लॉटरी विजेत्यांपैकी बहुतांश गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय आहेत. भारतीय लोक दुबईमध्ये सर्वाधिक लॉटरी खरेदी करतात.
11 वर्षांपासून दुबईमध्ये कार्यरत असलेल्या कंट्रोल रूम ऑपरेटर श्रीजू याला माहजूज सॅटरडे मिलियन्स लॉटरीचा 154 वा ड्रॉ जिंकल्याचे वृत्त गल्फ न्यूजने दिले आहे. त्याच्या विजेतेपदाची घोषणा नुकतीच करण्यात आली. श्रीजू हा मूळचा केरळमधील असून त्याला 6 वर्षांची जुळी मुले आहेत. लॉटरीद्वारे मिळालेल्या पैशातून आपण भारतातील मूळ गावी एक छानसे घर साकारणार असल्याचे त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केले.
श्रीजू याच्याप्रमाणेच भारतातील आणखी काही लोकांनाही लॉटरीद्वारे मोठी रक्कम प्राप्त झाल्याचे समजते. केरळमधील 36 वषीय शरत शिवदासनने शनिवारी एमिरेट्स ड्रॉ फास्टमध्ये 11 लाख रूपयांची लॉटरी जिंकली. तो दुबईत काम करतो. त्यापूर्वी मुंबईच्या मनोज भावसारनेही 9 नोव्हेंबरला याच ड्रॉमध्ये 16 लाख रूपये जिंकले. तो अबुधाबीमध्ये 16 वर्षांपासून काम करत आहे. तसेच 8 नोव्हेंबर रोजी 60 वषीय शिपिंग व्यवस्थापन अनिल ग्यानचंदानी यांनी दुबई ड्युटी फ्री मिलेनियम प्रमोशन लॉटरीमध्ये 8.32 कोटी रूपये जिंकले. तसेच 8 नोव्हेंबरलाच माहजूज लॉटरीत दोन भारतीयांनी प्रत्येकी 22 लाख रूपये जिंकले. त्यापैकी 50 वषीय शेरीन ही 20 वर्षांपासून दुबईत राहते.