डिसेंबरमध्ये भाजप, जानेवारीत काँग्रेस, फेबुवारीत पुन्हा भाजप
5 राज्यांमधील निवडणुकीदरम्यान नेत्यांचे पक्षांतराचे सत्र सुरूच आहे. उत्तरप्रदे, गोवा, उत्तराखंड आणि त्रिपुरानंतर पंजाबमध्येही हे सत्र सुरू झाले आहे. याचदरम्यान पंजाबमधून आयाराम, गयाराम यासारखे एक अजब प्रकरण समोर आले आहे. यात काँग्रेस आमदाराने 46 दिवसांमध्ये तिसऱयांदा पक्षांतर केले आहे.
पंजाबच्या हरगोविंदपूरचे काँग्रेस आमदार बलविंदर सिंह लड्डी यांनी शुक्रवारी काँगेसचे सदस्यत्व सोडून भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. भाजपचे महासचिव तरुण चुघ आणि नेते फतेह जंग सिंह यांनी बलविंदर यांनी सदस्यत्व प्रदान केले.
लड्डी यांनी सर्वप्रथम 28 डिसेंबर रोजी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला हात. त्याच्या 6 दिवसांनी जानेवारीत त्यांचे मनपरिवर्तन झाले आणि त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर 11 फेब्रुवारी रोजी त्यांनी पुन्हा काँग्रेस सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
लड्डी यांनी काँग्रेसच्या तिकीटावर मागील निवडणूक जिंकली होती. डिसेंबरमध्ये त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले, तेव्हा त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. परंतु भाजपने त्यांच्या जगी मंदीप सिंह यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज होत लड्डी यांनी पुन्हा पक्ष बदलला होता. बलविंदर सिंह लड्डी हे पेशाने उद्योजक आहेत.