या नियमांचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर
नवी दिल्ली
डिसेंबर महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आता उद्यापासून नवीन वर्ष म्हणजेच 2023 सुरू होणार आहे. नवीन वर्षात असे अनेक बदल (1 जानेवारी 2023 पासून नवीन नियम) होणार आहेत. यामध्ये बँकिंग आणि विमा यासह अनेक क्षेत्रात बदल होणार आहेत.
सीएनजी-पीएनजीच्या किमतीत बदल
महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या आठवडय़ात बहुतेक सीएनजी आणि पीएनजीच्या किमती बदलतात. नोव्हेंबर 2022 च्या सुरुवातीला व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. तथापि, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली आणि मुंबईत महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पेट्रोलियम कंपन्या गॅसच्या दरात बदल करतात. गेल्या काही महिन्यांत दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. आता या महिन्यात काय होते ते पहावे लागणार आहे.
गाडय़ा महागणार
2023 मध्ये कार्सच्या किमती वाढणार आहेत. यामध्ये मारुती सुझुकी, किया इंडिया, एमजी मोटर, ह्युंडाई इत्यादी बहुतेक कार कंपन्यांनी नवीन वर्षापासून त्यांच्या कार्सच्या किमती वाढवणार असल्याचे घोषित केले आहे. याचाच अर्थ आपल्याला नवीन वर्षात कार खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.
क्रेडिट कार्ड नियम
आता क्रेडिट कार्ड वापरल्यास, ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट मिळतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 जानेवारी 2023 पासून अनेक बँकांमधील रिवॉर्ड पॉइंट्सबाबतचे नियमही बदलणार आहेत. 1 जानेवारी 2023 पासून, 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय करणाऱयांसाठी ई-इनव्हॉइसिंग म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बिल सेटलमेंट अनिवार्य असेल. यापूर्वी ही मर्यादा 20 कोटी रुपये होती.
विम्याचा हप्ता
2023 सालापासून विमा प्रीमियम महाग होऊ शकतो. आयआरडीएआय वाहनांचा वापर आणि देखभाल यावर आधारित विमा प्रीमियम आकारणीबाबत नव्याने विचार करत आहे. महागडय़ा विमा प्रीमियमचा फटका बसणार आहे.