तिऊपतीहून परतताना दुर्घटना : मृत अथणी तालुक्यातील बडची गावचे
वार्ताहर /अथणी
आंध्रप्रदेश येथील तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या क्रूझर वाहनाने लॉरीला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात व्रूझरमधील पाच भाविक जागीच ठार झाले आहेत. सदर अपघातातील मृतांपैकी चौघेजण (बडची, ता. अथणी जि. बेळगाव) येथील एकाच कुटुंबातील आहेत. सदर अपघात 15 रोजी पहाटे 3.30 च्या सुमारास आंध्रप्रदेशातील चित्तूर-कडप महामार्गावर मठमपल्ली गावाजवळ झाला आहे. या अपघातात क्रूझरमधील अन्य 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.
हनुमंत निंगाप्पा आजूर (वय 52), महानंदा हनुमंत आजूर (वय 46), शोभा मल्लप्पा आजूर (वय 36), अंबिका आजूर (वय 19) (चौघेही रा. बडची ता. अथणी जि. बेळगाव), वाहनचालक हनुमंत सिद्धबा जाधव (वय 52) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. कस्तुरी, मेघा, शिवानंद, बसप्पा, मल्लप्पा, अक्षित, उदय, सुनंदा, महेश, साक्षी व बसवराज अशी जखमींची नावे आहेत. अपघातातील 11 जखमींपैकी 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तिरुपती सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर स्थानिकांनी बचावकार्य हाती घेतले. तसेच पोलिसांना माहिती दिली. अपघातग्रस्त क्रूझरमध्ये अडकलेले मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सरकारी ऊग्णालयात पाठविले.